IPL Team Preview : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 

यंदा आयपीएल स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.

Royal Challengers Bangalore
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

आयपीएल स्पर्धेतील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक संघ म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू. या संघात कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, युजवेंद्र चहल यांसारख्या उत्कृष्ट खेळाडूंचा समावेश आहे. या संघाकडून चाहत्यांना नेहमीच खूप अपेक्षा असतात. मात्र, चाहत्यांच्या या अपेक्षा बंगळुरूला पूर्ण करता आलेल्या नाहीत. बंगळुरूला अजून एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकता आलेली नाही. कोहली आणि एबी हे गेली अनेक वर्षे बंगळुरू संघाचा भाग आहेत. त्यामुळे या संघाला प्रत्येक मोसमाआधी जेतेपदाचे दावेदार मानले जाते. यंदाचे चित्रही काही वेगळे नाही.

यंदाही चाहत्यांना बंगळुरू संघाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. आयपीएलच्या मागील मोसमात हा संघ आठव्या स्थानावर म्हणजेच तळाला राहिला होता. याचे प्रमुख कारण म्हणजे गोलंदाजांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आणि फिनिशरची कमतरता. यावर तोडगा म्हणून मागील वर्षीच्या अखेरीस झालेल्या खेळाडू लिलावात बंगळुरूने क्रिस मॉरिस, अ‍ॅरॉन फिंच, इसुरु उदाना यांसारख्या परदेशी खेळाडूंना खरेदी केले.

फिंचने सलामीवीराची भूमिका पार पडल्यास कोहली किंवा एबी यांच्यापैकी एकाला मधल्या फळीत खेळता येऊ शकेल आणि ते फिनिशर म्हणूनही खेळतील. तसेच अष्टपैलू मॉरिस हा अखेरच्या षटकांत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांत चांगली कामगिरी करेल अशी बंगळुरूला आशा आहे.


संघ – भारतीय खेळाडू : विराट कोहली, युजवेंद्र चहल, शिवम दुबे, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, पार्थिव पटेल, पवन नेगी, गुरकिरत मान, देवदत्त पडिक्कल, शाहबाज अहमद, पवन देशपांडे

परदेशी खेळाडू : एबी डिव्हिलियर्स, क्रिस मॉरिस, अ‍ॅरॉन फिंच, डेल स्टेन, मोईन अली, इसुरु उदाना, जॉश फिलिपे, झॅम्पा   

जेतेपद – एकदाही नाही 

सलामीचा सामना – वि. हैदराबाद (२१ सप्टेंबर)