IPL Team Preview : सनरायजर्स हैदराबाद

यंदा आयपीएल स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.

sunrisers hyderabad
सनरायजर्स हैदराबाद

यंदा आयपीएल स्पर्धा जिंकण्यासाठी सनरायजर्स हैदराबाद संघालाही दावेदार मानले जात आहे. या संघाने २०१६ मध्ये आयपीएलचे अजिंक्यपद पटकावले होते. त्यानंतरच्या तीन वर्षांत मात्र त्यांच्या कामगिरीत चढ-उतार पाहायला मिळाला आहे. परंतु, आयपीएल स्पर्धेतील सर्वोत्तम सलामीची जोडी कोणत्या संघात असेल, तर ती म्हणजे सनरायजर्स हैदराबादकडे. कर्णधार डेविड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या हैदराबादच्या सलामीवीरांनी मागील मोसमात फारच उत्कृष्ट कामगिरी केली होती.

मागील वर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वॉर्नर अव्वल स्थानावर होता. त्याने १२ सामन्यांत १ शतक आणि ८ अर्धशतकांच्या मदतीने ६९२ धावा फटकावल्या होत्या. त्याला बेअरस्टोने १० सामन्यांत ४४५ धावा करत उत्तम साथ दिली होती. आता हे दोघे यंदाही या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक असतील. मागील दोन मोसम या संघाचे केन विल्यमसनने नेतृत्व केले होते. मात्र, आता पुन्हा एकदा वॉर्नरची कर्णधारपदी निवड झाली आहे. वॉर्नरच्या नेतृत्वातच हैदराबादने २०१६ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. तसेच यंदा ट्रेवर बेलिस यांच्या रूपात हैदराबादला नवे प्रशिक्षक लाभले आहेत. हैदराबादकडे वॉर्नर, बेअरस्टो, मनीष पांडे असे चांगले फलंदाज आणि राशिद खान, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद नबी यांच्यासारखे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. परंतु, त्यांच्याकडे अनुभवी फिनिशर नसून हीच त्यांची कमकुवत बाजू म्हणता येईल.

 


संघ – भारतीय खेळाडू : मनीष पांडे, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, शाहबाज नदीम, विजय शंकर, संदीप शर्मा, खलील अहमद, प्रियम गर्ग, विराट सिंग, वृद्धिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, बासिल थंपी, अभिषेक शर्मा, टी नटराजन, संदीप बावनका, संजय यादव, अब्दुल समाद 
परदेशी खेळाडू : डेविड वॉर्नर, राशिद खान, केन विल्यमसन, जॉनी बेअरस्टो, मिचेल मार्श, मोहम्मद नबी, बिली स्टॅनलेक, फॅबियन अ‍ॅलन  
जेतेपद – एकदा (२०१६)
सलामीचा सामना – वि. बंगळुरू (२१ सप्टेंबर)