घरक्रीडाआयपीएल संघांना युएईमध्ये हवे केवळ तीन दिवसांचे क्वारंटाईन!

आयपीएल संघांना युएईमध्ये हवे केवळ तीन दिवसांचे क्वारंटाईन!

Subscribe

आयपीएल स्पर्धा यंदा युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा यंदा युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच घोषित करण्यात आले. त्यानंतर खेळाडूंवर कोणते निर्बंध असणार, त्यांना किती काळ क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार अशा विविध मुद्यांवर मागील रविवारी झालेल्या आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत चर्चा झाली. बीसीसीआयने १०० पानी कार्यपद्धती (स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) जाहीर केली. यात खेळाडूंना युएईत दाखल झाल्यावर सहा दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार असे नमूद करण्यात आले होते. परंतु, आयपीएल संघांनी याला विरोध दर्शवला असून त्यांना क्वारंटाईनचा कालावधी केवळ तीन दिवसांचा हवा आहे.

दर पाचव्या दिवशी कोरोना चाचणी

बीसीसीआयने जाहीर केलेल्या कार्यपद्धतीनुसार, आयपीएलचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे सदस्य यांना युएईत सहा दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. तसेच त्यांची पहिल्या, तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी कोरोना चाचणी करण्यात येईल. ज्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह येईल, त्यांनाच आपापल्या संघांच्या सराव शिबिरात सहभागी होता येईल. त्यानंतर १९ सप्टेंबरपासून स्पर्धा सुरु झाल्यावर खेळाडूंची दर पाचव्या दिवशी कोरोना चाचणी होईल. मात्र, खेळाडूंना मागील सहा महिन्यांत फारसा सराव करता आलेला नसून त्यांना आता सरावासाठी जास्तीतजास्त वेळ हवा आहे. त्यामुळे युएईत दाखल झाल्यावर त्यांना सहा ऐवजी तीनच दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात यावे अशी विनंती आयपीएल संघ हे बीसीसीआय आणि आयपीएल अधिकाऱ्यांना करणार असल्याचे समजते.

- Advertisement -

‘कॉन्टॅक्ट-लेस फूड डिलिव्हरी’चीही मागणी

संघातील सर्व खेळाडू, तसेच खेळाडूंचे कुटुंबीय यांना एकत्रित बसून जेवता यावे यासाठीही आयपीएल संघांनी बीसीसीआयकडे परवानगी मागितली आहे. त्यासाठी आधी नोटीस देण्याचीही संघांची तयारी आहे. तसेच युएईत खेळाडू ज्या हॉटेलमध्ये राहणार आहेत, तिथे बाहेरून जेवण मागवण्यासाठी ‘कॉन्टॅक्ट-लेस फूड डिलिव्हरी’ (स्पर्श न करता) असावी अशी विनंती आयपीएल संघ बीसीसीआयकडे करणार आहेत. या मुद्यांवर बुधवारी झालेल्या संघमालक आणि आयपीएल अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -