घरक्रीडाआठही संघ २० ऑगस्टनंतर युएईमध्ये दाखल व्हावेत ही आयपीएलची इच्छा! 

आठही संघ २० ऑगस्टनंतर युएईमध्ये दाखल व्हावेत ही आयपीएलची इच्छा! 

Subscribe

आयपीएल संघ १० ते १५ ऑगस्टपर्यंत युएईमध्ये जाऊ शकतील असे सुरुवातीला म्हटले जात होते.

रविवारी पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत यंदा युएईमध्ये होणाऱ्या स्पर्धेविषयी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यापैकी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे गव्हर्निंग कौन्सिल आठही फ्रेंचायझी आणि इतर संबंधितांना युएईमध्ये एक आठवडा उशिराने दाखल होण्याची विनंती करणार आहे. आयपीएल संघ १०-१५ ऑगस्टपर्यंत युएईमध्ये जाऊ शकतील असे सुरुवातीला म्हटले जात होते. मात्र, कोरोनासाठीचे प्रोटोकॉल ठरवण्यासाठी गव्हर्निंग कौन्सिलला अधिक वेळ हवा असल्याने ते आठही संघांना २० ऑगस्टनंतर युएईमध्ये दाखल होण्यास सांगणार आहेत.

अंतिम सामना ८ ऐवजी १० नोव्हेंबरला

गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना ८ ऐवजी १० नोव्हेंबरला घेण्याबाबतही निर्णय झाला. आयपीएलचा तेरावा मोसम १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत पार पडेल, असे काही दिवसांपूर्वी गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल म्हणाले होते. मात्र, या स्पर्धेचे प्रसारण करणाऱ्या वाहिनीने वेळापत्रकाबाबत नाराजी व्यक्त करताना ही स्पर्धा दिवाळीच्या आठवड्यापर्यंत चालावी, जेणेकरून अधिक जाहिराती मिळतील असे म्हटले होते. त्यामुळे गव्हर्निंग कौन्सिलने अंतिम सामना ८ ऐवजी १० नोव्हेंबरला आयोजित करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

मोठा प्रेक्षकवर्ग लाभेल अशी बीसीसीआयला आशा

१० नोव्हेंबरला मंगळवार असून आयपीएलचा अंतिम सामना रविवारी न होण्याची ही पहिलीच वेळ असेल. परंतु, दिवाळीचा आठवडा असल्याने मंगळवार हासुद्धा सुट्टीचा दिवस असेल आणि त्यामुळे सामना पाहणाऱ्यांची संख्या कमी होणार नाही असा गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यांना विश्वास आहे. तसेच रात्रीच्या सामन्यांना भारतीय वेळेनुसार ८ ऐवजी ७.३० वाजता, तर दुपारच्या सामन्यांना ४ ऐवजी ३.३० वाजता सुरुवात होणार आहे. त्यामुळे यंदाही आयपीएलला मोठा प्रेक्षकवर्ग लाभेल अशी बीसीसीआयला आशा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -