घरक्रीडासामना रंगतदार वळणावर

सामना रंगतदार वळणावर

Subscribe

अखेरच्या दिवशी विदर्भाला २४३, शेष भारताला ९ विकेटची गरज, इराणी करंडक

हनुमा विहारीने केलेल्या सामन्यातील दुसर्‍या शतकामुळे शेष भारत आणि विदर्भ यांच्यातील इराणी करंडकाचा सामना रंगतदार वळणावर आहे. पहिल्या डावात ९५ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर शेष भारताने आपला दुसरा डाव ३ बाद ३७४ धावांवर घोषित केला आणि विदर्भाला सामना जिंकण्यासाठी २८० धावांचे आव्हान दिले. याचा पाठलाग करताना विदर्भाची चौथ्या दिवसअखेर १ बाद ३७ अशी धावसंख्या आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी हा सामना जिंकण्यासाठी विदर्भाला २४३ धावांची, तर शेष भारताला ९ विकेटची गरज आहे.

या सामन्याच्या चौथ्या दिवशी २ बाद १०२ वरून पुढे खेळणार्‍या शेष भारताच्या हनुमा विहारी आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने संयमाने फलंदाजी केली. दिवसाच्या आठव्या षटकात विहारीने आपले अर्धशतक पूर्ण केले, तर काही षटकांनंतर रहाणेने आदित्य सरवटेच्या गोलंदाजीवर चौकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. पुढेही या दोघांनी आपली चांगली फलंदाजी सुरु ठेवली. लंचच्या दोन षटके आधी विहारीने अक्षय वखरेला चौकार लगावत आपले सामन्यातील दुसरे शतक झळकावले. हे शतक त्याने १९५ चेंडूंत पूर्ण केले. त्याच्या आणि रहाणेच्या संयमी फलंदाजीमुळे शेष भारताने पहिल्या सत्रात एकही विकेट गमावली नाही.

- Advertisement -

लंचनंतर काही षटकांत सरवटेने सामन्यात दुसर्‍यांदा रहाणेला बाद केले. रहाणेला अक्षय वाडकरने यष्टिचित केले. रहाणेने २३२ चेंडूंत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ८७ धावा केल्या. तसेच त्याने आणि विहारीने जवळपास ८० षटके खेळत तिसर्‍या विकेटसाठी २२९ धावांची भागीदारी केली. तो बाद झाल्यानंतरही विहारीने आपली चांगली फलंदाजी सुरु ठेवत १५० धावा पूर्ण केल्या. पुढे त्याने आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मुंबईकर श्रेयस अय्यरने आक्रमकपणे फलंदाजी केली. अय्यरने अवघ्या ४५ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेर शेष भारताने ३ बाद ३७४ धावांवर आपला डाव घोषित केला. विहारी आणि अय्यरने जवळपास १५ षटकांत ९९ धावांची भागीदारी केली. विहारीने ३०० चेंडूंत १९ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने नाबाद १८० तर अय्यरने ५२ चेंडूंत ५ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने नाबाद ६० धावा केल्या.

२८० धावांचा पाठलाग करताना विदर्भाचा कर्णधार फैझ फझल पहिल्याच षटकात खातेही न उघडता माघारी परतला. यानंतर रघुनाथ संजय आणि अथर्व तायडेने सावधपणे फलंदाजी केल्यामुळे शेष भारताच्या गोलंदाजांना विकेट मिळवण्यात अपयश आले.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक –

शेष भारत : ३३० आणि ३ बाद ३७४ डाव घोषित (हनुमा विहारी १८०*, अजिंक्य रहाणे ८७, श्रेयस अय्यर ६१*; आदित्य सरवटे २/१४१) वि. विदर्भ : ४२५ आणि १ बाद ३७ (रघुनाथ संजय १७*, अथर्व तायडे १६*; अंकित राजपूत १/१०).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -