घरक्रीडाइंग्लंडचा आयरिश हिरो

इंग्लंडचा आयरिश हिरो

Subscribe

इंग्लंड ही क्रिकेटची जननी-ब्रिटिश साम्राज्याच्या वसाहतीमध्ये आपसुकच क्रिकेटचा प्रचार, प्रसार झाला. वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा म्हणजे राष्ट्रकुळातील देशाची क्रिकेट स्पर्धा असे कुत्सितपणे म्हटले जाते. क्रिकेटची कितीही हेटाळणी झाली तरी, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ या दक्षिण आशियाई देशात क्रिकेट हाच सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेटचे मुख्यालय लॉर्ड्सवरच आहे.

एमसीसी क्रिकेटचे नियम, तंत्र याबाबत अधिकारवाणीने भाष्य करते. आयसीसीचे (आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती) मुख्यालय एका शतकाहून अधिक काळ लॉर्ड्सवरच होते. अलीकडेच ते दुबईला हलविण्यात आले. बाराव्या वर्ल्डकपचे यजमानपद इंग्लंडला लाभले असून, तिकडे होणारी ही पाचवी वर्ल्डकप स्पर्धा! परंतु अजूनही इसीबीच्या (इंग्लंड वेल्स क्रिकेट बोर्ड) कार्यालयात वर्ल्डकप ट्रॉफी विराजमान झालेली नाही. यंदा मात्र आयरिश कर्णधाराच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या जेतेपदाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

- Advertisement -

आयर्लंडकडून वर्ल्डकप स्पर्धेत खेळल्यानंतर २०१५ च्या वर्ल्डकप स्पर्धेपासून इंग्लंडच्या वनडे संघाच्या नेतृत्वाची धुरा इऑन मॉर्गन सांभाळतो आहे. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील वर्ल्डकप स्पर्धेत (२०१५) इंग्लंडचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले, पण इंग्लंड निवड समितीने मॉर्गनवरच भरवसा ठेवला. मंगळवारी त्याने मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर १७ षटकारांसह ७१ चेंडूतच १४८ धावांची फटकेबाज खेळी खेळल्यामुळे इंग्लंडने अफगाणिस्तानविरुध्द ६ बाद ३९७ अशी टोलेजंग विक्रमी धावसंख्या उभारली. मॉर्गनने या घणाघाती खेळीदरम्यान अनेक विक्रम नोंदवले. क्रिस गेल, रोहित शर्मा, एबी डिव्हिलीयर्स यांचा १६ षटकारांचा विक्रम त्याने मोडीत काढला.

वनडेत एका खेळीदरम्यान सर्वाधिक षटकारांचा विक्रम मॉर्गनच्या नावावर लागला. पाठदुखीने त्रस्त असलेल्या मॉर्गनने लंगडत लंगडत विक्रमी शतकी खेळी केली. अशी खेळी करू शकेन असे मला वाटले नव्हते, असे नमूद करून मॉर्गनने संघातील नौजवान खेळाडूंशी मुकाबला करू शकतो हीच आपल्यासाठी खास बाब असल्याचे सांगितले. ताकदवान संघाची क्षमता अफगाणिस्तानकडे असून, वर्ल्डकपसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याचे समाधान वाटते, असे मॉर्गनने सांगितले.

- Advertisement -

मॉर्गनच्या षटकारांची गती वाखाणण्याजोगीच! ७१ चेंडूत १७ षटकार, म्हणजे जवळपास ४ चेंंडूमागे एक षटकार! अफगाणिस्तानच्या राशिद खानची भरपूर पिटाई करताना त्याने २० चेंडूत ५८ धावा तडकावल्या. राशिदचे गोलंदाजीचे पृथकरण ९-०-११०-०. यावरूनच वर्ल्डकपमधील सर्वाधिक पिटाई झालेला गोलंदाज अशी नोंद कायम राहील. डावखुर्‍या मॉर्गनचे फटके बहुतांशी लेगलाच होते. थर्ड मॅन ते एक्स्ट्रा कव्हर्सच्या पट्ट्यात त्याने फक्त २१ धावा काढल्या. १७ पैकी त्याचे १२ षटकार लेगसाईडलाच होते, लाँग ऑफ ते स्स्क्वेअर लेग या टप्प्यातले. रिव्हर्स स्कुप्स, स्वीप यावर त्याचा पूर्वी भर असायचा, परंतु अफगाणिस्तानविरुध्द त्याने रिव्हर्स स्वीपचा एकच फटका लगावला तो नबीच्या गोलंदाजीवर.

ब्रिटिशांचे क्रीडाप्रेम तसे सर्वश्रुतच. फुटबॉलची अमाप क्रेझ असून, मँचेस्टर युनायटेड, मँचेस्टर सिटी, चेल्सी, लिव्हरपूल अशा विविध फुटबॉल क्लबच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. अ‍ॅशेसची महती निराळी, वर्ल्डकपनंतर इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ‘अ‍ॅशेस’ मालिका रंगेल. ५ दिवसांच्या पारंपरिक कसोटी क्रिकेट सामन्यांना जाणकार, दर्दी क्रिकेट रसिक निश्चितच हजेरी लावतील. आयरिश इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने वर्ल्डकप पटकावल्यास ट्रॅफल्गार स्क्वेअरमध्ये मॉर्गनसह इंग्लिश क्रिकेट संघाचे जंगी स्वागत करण्यात येईल.

शोभायात्राही आयोजित केली जाईल. फ्रेड पेरीनंतर विम्बल्डनमध्ये कित्येक वर्षे ब्रिटिश विजेता नव्हता. स्कॉटलंडच्या अँडी मरेने विम्बल्डन विजेतेपद पटकावल्यावर ब्रिटिशांनी विजयोत्सव साजरा केला. १४ जुलै २०१९ रोजी लॉर्ड्सच्या बाल्कनीत इऑन मॉर्गन वर्ल्डकपसह उभा असल्याचे चित्र ब्रिटिश क्रीडाप्रेमी नक्कीच रंगवत असतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -