घरIPL 2020IPL 2020 : आमच्या निराशाजनक कामगिरीला 'ही' गोष्ट कारणीभूत - श्रेयस अय्यर

IPL 2020 : आमच्या निराशाजनक कामगिरीला ‘ही’ गोष्ट कारणीभूत – श्रेयस अय्यर

Subscribe

दिल्लीला मागील सहा पैकी केवळ एक सामना जिंकता आला आहे.  

मुंबई इंडियन्सने आयपीएल क्वालिफायर-१ च्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर ५७ धावांनी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. विक्रमी चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईची ही अंतिम फेरी गाठण्याची ही सहावी वेळ होती. दिल्लीचा संघ या सामन्यात पराभूत झाला असला तरी त्यांना अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. मुंबईविरुद्ध मात्र दिल्लीला त्यांचा खेळ उंचावण्यात अपयश आले. यंदा दिल्लीला आयपीएल स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. दिल्लीचा संघ यंदा पहिल्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु, त्यांना मागील काही सामन्यांत चांगला खेळ करता आलेला नाही. त्यांना मागील सहा पैकी केवळ एक सामना जिंकता आला आहे. दिल्लीच्या या खालावलेल्या कामगिरीला बायो-बबल कारणीभूत असल्याचे कर्णधार श्रेयस अय्यरला वाटते.

‘आजचा दिवस बहुधा आमचा नव्हता. मला आमच्या संघाबद्दल नकारात्मक पद्धतीने बोलायचे नाही. मात्र, पुढील सामन्यात आम्ही अधिक चांगल्या मानसिकतेने खेळले पाहिजे. मागील काही सामन्यांत आम्ही सर्वोत्तम खेळ केला नाही हे खरे आहे. बायो-बबलमध्ये राहून तुम्ही रोज त्याच-त्याच गोष्टी करता. या परिस्थितीत राहणे आणि सामने खेळणे सोपे नाही. मात्र, आम्ही खूप मेहनत घेत आहोत,’ असे श्रेयस अय्यर म्हणाला.

- Advertisement -

मुंबईविरुद्धच्या सामन्याविषयी अय्यरने सांगितले, ‘आम्ही दोन विकेट झटपट घेत त्यांना ४ बाद १०२ असे अडचणीत टाकले होते. त्यावेळी आम्ही आणखी दोन विकेट मिळवल्या असत्या तर मुंबईच्या कमी धावा झाल्या असत्या. मात्र, आम्हाला त्या संधीचा फायदा घेता आला नाही. मुंबईला १७० पर्यंत रोखले असते, तर आम्ही जिंकू शकलो असतो.’ मुंबईची ४ बाद १०२ अशी अवस्था झाली होती. मात्र, अखेरच्या षटकांमध्ये ईशान किशन (नाबाद ५५) आणि हार्दिक पांड्या (नाबाद ३७) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईने २० षटकांत ५ बाद २०० अशी धावसंख्या उभारली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -