घरक्रीडावॉर्नर विक्रम मोडेल असे वाटले होते!

वॉर्नर विक्रम मोडेल असे वाटले होते!

Subscribe

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने अ‍ॅडलेड येथे झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या डे-नाईट कसोटीच्या पहिल्या डावात नाबाद ३३५ धावांची खेळी केली. तो विंडीजचा महान फलंदाज ब्रायन लाराचा (नाबाद ४००) सर्वोच्च धावांचा विक्रम मोडणार असे वाटत असतानाच कर्णधार टीम पेनने ऑस्ट्रेलियाचा डाव घोषित केला. त्यामुळे वॉर्नरला विक्रमासाठी ६५ धावा कमी पडल्या. वॉर्नर नवा विक्रम प्रस्थपित करणार असे लारालाही वाटत होते. वॉर्नरने आपल्या खेळीदरम्यान महान डॉन ब्रॅडमन (३३४) यांनाही मागे टाकले.

डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडल्यानंतर वॉर्नर माझाही विक्रम मोडले अशी मला आशा होती. त्याला नवा विक्रम प्रस्थापित करताना पाहायला मला आवडले असते. त्याने फारच अप्रतिम फलंदाजी केली. मला ठाऊक आहे की ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकायचा होता. मात्र, त्यांनी वॉर्नरला विक्रम करण्याची संधी दिली पाहिजे होती, असे लारा म्हणाला.

- Advertisement -

लाराने तब्बल दोन वेळा कसोटीत सर्वोच्च धावांचा विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने २००४ मध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद ४०० धावांची खेळी केली होती, जो विक्रम अजूनही कोणी मोडलेला नाही. मात्र, त्याआधी त्याने १९९४ साली ३७५ धावांची खेळी करत गॅरी सोबर्स (३६५) यांना मागे टाकले आणि सर्वोच्च धावांचा विक्रम केला होता. लाराने ३६५ धावांचा टप्पा पार केल्यानंतर सोबर्स यांनी बार्बाडोस येथील मैदानात उतरून त्याचे अभिनंदन केले. मीसुद्धा वॉर्नरचे अभिनंदन करण्याच्या तयारीत होतो, असे लाराने नमूद केले.

विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. वॉर्नरने विक्रम केला असता, तर मलाही (सोबर्सप्रमाणे) मैदानात उतरून त्याचे अभिनंदन करायला आवडले असते. मी अ‍ॅडलेडमध्येच होतो. त्यामुळे मैदानात नाही, तर किमान मैदानाबाहेर भेटून मी वॉर्नरचे अभिनंदन केले असते. यावेळी वॉर्नरला ४०० धावा करता आल्या नसल्या, तरी भविष्यात त्याला पुन्हा संधी मिळू शकेल, असे लाराने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -