सिंधूचे जेतेपदाचे लक्ष्य

Mumbai
जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धा

जपानच्या अकाने यामागूचीविरुद्ध अंतिम सामन्यात झालेल्या पराभवामुळे भारताच्या पी.व्ही.सिंधूचे इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. सिंधूला मागील सात महिन्यांत एकही स्पर्धा जिंकण्यात यश आलेले नाही. मागील वर्षी डिसेंबरमध्ये तिने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धा जिंकली होती. मात्र, आता तिला मंगळवारपासून सुरू होणार्‍या जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम सामन्यांमधील पराभवाची मालिका खंडित करण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. दुखापतीमुळे इंडोनेशिया ओपनला मुकणारी भारताची दुसरी स्टार खेळाडू सायना नेहवाल जपान ओपनमध्ये पुनरागमन करणार आहे.

इंडोनेशिया ओपनच्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असणार्‍या यामागूचीने सिंधूचा १५-२१, १६-२१ असा सरळ गेममध्ये पराभव केला. परंतु, आता हा पराभव विसरून जपान ओपन जिंकण्याचे तिचे लक्ष्य आहे. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत तिचा सामना चीनच्या हान युईशी होणार आहे. सिंधूला पहिल्या फेरीतील सामना जिंकण्यात यश आल्यास दुसर्‍या फेरीत तिच्यासमोर स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिल्मोर किंवा जपानच्या अया ओहोरीचे आव्हान असेल. तसेच या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना यामागूचीविरुद्ध होऊ शकेल. इंडोनेशिया ओपनमधील अंतिम सामना गमावल्यानंतर सिंधू म्हणाली की, इंडोनेशिया ओपनमध्ये केलेल्या कामगिरीमुळे माझा आत्मविश्वास वाढला असून याचा फायदा मला जपानमध्ये होईल, अशी आशा आहे.

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत किदाम्बी श्रीकांत आणि एच.एस.प्रणॉय या भारतीय खेळाडूंमध्ये लढत होणार आहे. या दोन खेळाडूंमध्ये आतापर्यंत ५ सामने झाले असून त्यापैकी ४ सामने श्रीकांतने जिंकले आहेत. भारताच्याच साई प्रणितचा सामना जपानच्या केंटो निशिमोटोशी, तर समीर वर्माचा सामना डेन्मार्कच्या आंद्रेस अँटोनसेनशी होईल.