Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IND vs AUS : बुमराह, सिराजवर वर्णद्वेषी टीका; बीसीसीआयने केली तक्रार 

IND vs AUS : बुमराह, सिराजवर वर्णद्वेषी टीका; बीसीसीआयने केली तक्रार 

या प्रकरणामुळे २००७-०८ मध्ये सिडनी येथेच झालेल्या 'मंकीगेट' प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या. 

Related Story

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस भारतीय संघासाठी विसरण्याजोगा ठरला. भारताच्या फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात मोठी आघाडी मिळाली. त्यातच ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावादरम्यान एका मद्यप्राशन केलेल्या चाहत्याने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांवर वर्णद्वेषी टीका केली. याबाबत भारतीय संघाने सामनाधिकारी डेविड बून यांच्याकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणामुळे २००७-०८ मध्ये सिडनी येथेच झालेल्या ‘मंकीगेट’ प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या.

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होत असलेल्या या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी एका चाहत्याने सिराजला मंकी (माकड) म्हणून संबोधले. ‘जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोन भारतीय खेळाडूंवर एका मद्यप्राशन केलेल्या चाहत्याने वर्णद्वेषी टीका केली. बीसीसीआयने याबाबत आयसीसीचे सामनाधिकारी डेविड बून यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे,’ असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर कर्णधार अजिंक्य रहाणे, सिराज, बुमराहसह भारताचे काही सिनियर खेळाडू पंच आणि सुरक्षारक्षकांशी बराच वेळ चर्चा करताना दिसले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना बुमराह आणि सिराजवर या चाहत्याने वर्णद्वेषी टीका केल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.

सिराज आणि बुमराह यांच्यावर वर्णद्वेषी टीका झाल्याने ‘मंकीगेट’ प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या. २००७-०८ मध्ये सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरच झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अँड्र्यू सायमंड्सला ‘मंकी’ म्हणून संबोधल्याचा आरोप भारताचा ऑफस्पिनर हरभजन सिंगवर करण्यात आला होता. हरभजनने मात्र हे आरोप फेटाळून लावले होते.

- Advertisement -