IPL 2020 : बुमराह जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक – बॉंड

बुमराहने आयपीएलमध्ये आतापर्यंत ८४ सामन्यांत ९३ विकेट घेतल्या आहेत.  

जसप्रीत बुमराह

मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने विक्रमी चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. मुंबईच्या या यशात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बुमराह २०१३ पासून मुंबईच्या संघाचा भाग असून आतापर्यंत त्याने ८४ सामन्यांत ९३ गडी बाद केले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये सुरुवातीच्या काही सामन्यांत बुमराहला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. मात्र, हळूहळू त्याने त्याचा खेळ उंचावला आहे. त्यामुळे मुंबईचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉंडने बुमराहची स्तुती केली.

स्वतःमध्ये सुधारणा करण्याच्या प्रयत्नात असतो

बुमराह हा उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याच्यासोबत मी गेली सहा वर्षे काम करत आहे. त्याला मार्गदर्शन करताना मला नेहमीच खूप मजा येते. बुमराहची मला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे तो सतत स्वतःमध्ये सुधारणा करण्याच्या प्रयत्नात असतो. प्रत्येकच मोसमात तो वेगळा एखादा चेंडू टाकताना दिसतो. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीत विविधता येते. त्याला स्वतःमध्ये सुधारणा करायची असते आणि प्रशिक्षक म्हणून तुम्ही खेळाडूमध्ये ही जिद्द पाहता, तेव्हा तुम्हाला खूप आनंद होतो. बुमराहमधील याच गुणामुळे तो जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असल्याचे बॉंडने सांगितले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही सातत्यपूर्ण कामगिरी

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून बुमराह सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाज मानला जातो. आयपीएल स्पर्धेसह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांत कसोटीच्या एका डावात पाच विकेट घेणारा बुमराह हा आशियातील पहिला गोलंदाज आहे.