घरIPL 2020IPL 2020 : जसप्रीत बुमराह नव्या चेंडूने गोलंदाजीस उत्सुक होता - शेन बॉंड

IPL 2020 : जसप्रीत बुमराह नव्या चेंडूने गोलंदाजीस उत्सुक होता – शेन बॉंड

Subscribe

बुमराहने राजस्थानविरुद्ध २० धावांत ४ विकेट घेतल्या.  

राजस्थान रॉयल्सविरुद्धचा आयपीएल सामना मुंबई इंडियन्सने ५७ धावांनी जिंकला. मुंबईने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १९३ अशी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना राजस्थानचा डाव १३६ धावांत आटोपला आणि मुंबईने सामना जिंकला. मुंबईच्या या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली ती वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने. बुमराहने ४ षटकांमध्ये २० धावांत ४ विकेट घेतल्या. बुमराहने या सामन्यात पहिल्यांदाच नव्या चेंडूने गोलंदाजी केली आणि डावाच्या दुसऱ्याच षटकात स्टिव्ह स्मिथला माघारी पाठवले. त्यामुळे मुंबईचा विजयाचा मार्ग सोपा झाला. बुमराह नव्या चेंडूने गोलंदाजी करण्यास खूप उत्सुक होता, असे सामन्यानंतर मुंबईचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉंडने सांगितले.

बुमराहमध्ये चेंडू स्विंग करण्याची क्षमता

बुमराहला नव्या चेंडूने गोलंदाजी करायची होती. त्यामुळे राजस्थानविरुद्धच्या सामन्याआधी एक दिवस आम्ही बरीच चर्चा केली. आम्ही त्याला या स्पर्धेत थोड्या बचावात्मक पद्धतीने वापरले होते. त्याला पॉवर-प्लेच्या अखेरच्या काही षटकांत आम्ही गोलंदाजी देत होतो. मात्र, या सामन्याची खेळपट्टी आधी कोणत्याही सामन्यात वापरली नव्हती. तसेच या खेळपट्टीवर बरेच गवत होते. बुमराहमध्ये चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे. राजस्थानचे सर्व प्रमुख फलंदाज हे वरच्या क्रमांकांवर खेळतात आणि त्यांना बाद करणे आमच्यासाठी गरजेचे होते. त्यामुळे आम्ही बुमराहला नवा चेंडू वापरण्याची संधी दिली आणि त्याने या संधीचा उपयोग करत विकेट मिळवल्याचे बॉंड म्हणाला. बुमराहला याआधीच्या ५ सामन्यांत केवळ ७ विकेट घेता आल्या होत्या. त्यामुळे तो स्वतःच्या कामगिरीवर नाखूष होता, असेही बॉंडने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -