Eng vs Aus : बेअरस्टोच्या शतकामुळे इंग्लंड तीनशे पार 

बेअरस्टोचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील दहावे शतक ठरले.   

jonny bairstow
जॉनी बेअरस्टो

सलामीवीर जॉनी बेअरस्टोने केलेल्या दमदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने तीनशे धावांचा टप्पा पार केला. त्यांनी ५० षटकांत ७ बाद ३०२ अशी धावसंख्या उभारली. बेअरस्टोने या डावात १२६ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ११२ धावांची खेळी केली. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील दहावे, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचे दुसरे शतक ठरले. त्याच्या या शतकामुळे इंग्लंडने हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियापुढे ३०३ धावांचे आव्हान ठेवले.

इंग्लंडची बिकट अवस्था 

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, सुरुवातीला त्यांच्यासाठी हा निर्णय फारसा लाभदायक ठरला नाही. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने जेसन रॉय आणि जो रूट यांना डावाच्या पहिल्या दोन चेंडूंवर माघारी पाठवले. त्यामुळे इंग्लंडची २ चेंडूनंतर २ बाद शून्य अशी बिकट अवस्था झाली होती. पुढे कर्णधार मॉर्गन आणि बेअरस्टो यांनी ६७ धावांची भागीदारी रचत ही पडझड थांबवली. मात्र, त्यानंतर लेगस्पिनर झॅम्पाने मॉर्गन (२३) आणि बटलर (८) यांना झटपट बाद करत इंग्लंडला पुन्हा अडचणीत टाकले.

बिलिंग्स, वोक्सची अर्धशतके

एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूने बेअरस्टोने अप्रतिम फलंदाजी सुरु ठेवत ११६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याला सॅम बिलिंग्स (५७) आणि क्रिस वोक्स (नाबाद ५३) यांनी उत्तम साथ दिली. बेअरस्टो आणि बिलिंग्स यांनी पाचव्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे इंग्लंडने ५० षटकांत ७ बाद ३०२ अशी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने ७४ धावांत ३ विकेट, तर झॅम्पाने ५१ धावांत ३ विकेट घेतल्या.