काजल कुमारी, फहिमला काझीला जेतेपद

Mumbai
काजल कुमारी, फहिमला काझी

फहिम काझीने पुरुषांमध्ये तर काजल कुमारीने महिलांमध्ये बोरिवलीच्या मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन अयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे जेतेपद पटकावले. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या फहिम काझीने मुंबईच्याच झैद अहमदचा पराभव केला. पहिला सेट १८-२५ असा गमावल्यानंतरही फहिमने जिंकण्याच्या जिद्दीने खेळ करत दुसरा सेट २५-१५ असा जिंकून सामन्यात बरोबरी केली.

तिसर्‍या सेटच्या दुसर्‍या बोर्डात त्याने व्हाईट स्लॅमची नोंद करत थेट १२ गुण कमवले आणि ७ व्या बोर्डात २५-६ असा विजय मिळवित आपल्या पहिल्या राज्यस्तरीय विजेतेपदाची नोंद केली. दुसरीकडे महिला एकेरीच्या अंतिम लढतीत मुंबईच्या काजल कुमारीने ऐशा महम्मद साजिदचा २३-११, १३-१८, १४-११ असा पराभव केला.

पुरुष एकेरीच्या तिसर्‍या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या महम्मद घुफ्रानने विश्व विजेत्या प्रशांत मोरेला १४-२५, २३-१५, २५-६ अशी धूळ चारली. महिलांच्या तिसर्‍या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात मुंबईच्या जान्हवी मोरेने नुकत्याच छत्रपती पुरस्कार मिळविलेल्या मैत्रेयी गोगटेचा २३-१३,१९-१५ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.