कार्तिक की पंत, कोण असणार दुसरा यष्टीरक्षक?

वर्ल्डकपसाठी संघनिवड आज

Mumbai
कार्तिक Vs पंत

पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये सुरू होणार्‍या क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघाची सोमवारी निवड होणार आहे. भारतीय संघाने मागील काही काळात एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केले असल्याने विश्वचषकासाठी २-३ जागा सोडता बाकी खेळाडूंचे इंग्लंडचे तिकीट पक्के आहे. त्यामुळे मुंबईमध्ये होणार्‍या निवड समितीच्या बैठकीत या २-३ जागांबद्दल बरीच चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यातही महेंद्रसिंग धोनी व्यतिरिक्त दुसरा यष्टीरक्षक कोण असणार यावर सर्वात जास्त चर्चा होण्याची शक्यता आहे. निवड समितीसमोर अनुभवी दिनेश कार्तिक आणि युवा रिषभ पंत असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे या दोघांपैकी विश्वचषकासाठी कोणाची निवड होणार याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

काही महिन्यांपूर्वीपर्यंत दिनेश कार्तिकचे या संघातील स्थान निश्चित मानले जात होते, परंतु त्याला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. कार्तिकने २०१८ आणि २०१९ मध्ये मिळून १२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांत त्याला २४२ धावाच करता आल्या आहेत. तसेच त्याला एकही अर्धशतक करता आलेले नाही. मात्र, संघ व्यवस्थापनाने मागील वर्षी आम्ही कार्तिककडे ‘फिनिशर’ म्हणून पाहतो असे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्याने किती धावा केल्या यापेक्षा त्याने या धावा कितीच्या स्ट्राईक रेटने केल्या हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचा २०१८ मध्ये स्ट्राईक रेट ७३.५६ चा होता. मात्र, २०१९ मध्ये यात सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. त्याने यावर्षी ९८.५८ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत, पण असे असतानाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला संघात स्थान मिळाले नाही. त्याच्याऐवजी निवड समितीने कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या युवा रिषभ पंतला संघात स्थान दिले.

रिषभला या मालिकेच्या अखेरच्या २ सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली, पण या संधीचा त्याला फारसा फायदा घेता आला नाही. त्याने या २ सामन्यांत २६ च्या सरासरीने ५२ धावाच केल्या. यष्टीरक्षणातही त्याने बर्‍याच चुका केल्या. तसेच सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात २७ चेंडूत ७८ धावांची मॅचविनिंग खेळी केल्यानंतर इतर सामन्यांत त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यातच रिषभने अधिक जबाबदारीने खेळले पाहिजे, असे दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग काही दिवसांपूर्वीच म्हणाला. त्यामुळे रिषभ अजून विश्वचषकासारख्या स्पर्धेसाठी तयार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकूणच कार्तिक आणि पंत यांच्यापैकी विश्वचषकासाठी कोणाची निवड करायची हा प्रश्न कठीण असला तरी निवड समितीला याचे उत्तर सोमवारी शोधावेच लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here