कार्तिकने उगाचच ‘तो ’ सिंगल नाकारला !

Mumbai
harbhajan singh
हरभजन सिंग

भारताने न्यूझीलंडविरुद्धचा अखेरचा टी-२० सामना ४ धावांनी गमावला. या पराभवामुळे भारताने ही मालिका २-१ अशी गमावली. हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंडने भारताला २१२ धावांचे आव्हान दिले होते. याचा पाठलाग करताना भारताला अखेरच्या षटकात सामना जिंकण्यासाठी १६ धावांची गरज होती. मात्र, दिनेश कार्तिक आणि कृणाल पांड्याला टीम साऊथीच्या या षटकात ११ धावाच काढता आल्या. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कार्तिकने २ धावा काढल्यानंतर त्याला दुसर्‍या चेंडूवर एकही धाव काढता आली नाही. तिसर्‍या चेंडूवर कार्तिकला एक धाव काढायची त्याला संधी होती. पण, एक धाव काढून कृणालला स्ट्राइक देण्याऐवजी त्याने स्वत:कडेच स्ट्राइक ठेवणे पसंत केले. त्याने ती धाव काढली पाहिजे होती, असे मत हरभजन सिंगने व्यक्त केले आहे.

अखेरचा टी-२० सामना दोन्ही संघांना जिंकण्याची संधी होती. दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर एक धाव उगीचच नाकारली. त्याच्या या चुकीच्या निर्णयामुळेच कदाचित भारताचा पराभव झाला. कृणाल या सामन्यात चांगली फटकेबाजी करत होता. त्याने साऊथीच्या आधीच्या षटकात १८-१९ धावा काढल्या होत्या. त्यामुळे ‘ती’ एक धाव न काढून कार्तिकने संघाचे नुकसान केले, असे हरभजन म्हणाला.

हरभजनने कार्तिकवर टीका केली असली तरी त्याने भारतीय संघाची स्तुती केली आहे. त्याच्या मते भारतासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौरा खूप चांगल्या गोष्टी देणारा होता. भारताला या दौर्‍यांमधून खूप काही मिळाले आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौरा नेहमीच अवघड असतो. तुम्ही अखेरच्या सामन्यापर्यंत मानसिकदृष्ठ्या थकलेले असता. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करणे, तसेच न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका सहजपणे जिंकणे या गोष्टी भारताच्या दृष्टीने खूपच खास होत्या, असे हरभजनने सांगितले.