सकारात्मक खेळ करत राहणार!

Mumbai
रिषभ पंतचे विधान

रिषभ पंतकडे भारतीय संघ महेंद्रसिंग धोनीनंतरचा महान यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून पाहत आहे. २१ वर्षीय पंतला कसोटी क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करण्यात यश आले आहे, पण टी-२० आणि खासकरून एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला फारसे यश मिळालेले नाही. त्यातच त्याच्या संयमाने फलंदाजी करण्याच्या क्षमतेवरही वारंवार प्रश्न उपस्थित केले जातात. विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धची उपांत्य फेरी (३५ चेंडूत २०) आणि मागील रविवारी झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात (५६ चेंडूत ३२) सावध सुरुवात केल्यानंतर तो खराब फटका मारून बाद झाला. मात्र, असे असले तरी पंत यापुढेही सकारात्मक खेळ करत राहणार आहे.

प्रत्येक खेळाडूचे मोठी खेळी करण्याचे लक्ष्य असते आणि तेच माझेही आहे. मात्र, दर वेळी मैदानात उतरताना मी मोठी खेळी करण्याबाबत विचार करू शकत नाही. मला फक्त सकारात्मक खेळ करायचा आहे आणि भारताला जास्तीतजास्त सामने जिंकवून द्यायचे आहेत. संघात माझे स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने प्रत्येक सामना माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मला दर सामन्यागणिक माझ्या खेळात सुधारणा करायची आहे, असे पंतने सांगितले.

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकापासून पंत एकदिवसीय संघात चौथ्या क्रमांकावर खेळत आहे. मात्र, त्याची या क्रमांकावरील कामगिरी साधारण आहे. विंडीजविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात पाचव्या क्रमांकावर खेळणार्‍या श्रेयस अय्यरने ७१ धावांची खेळी केली. त्यामुळे अय्यरला चौथ्या क्रमांकावर पाठवायला हवे, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. पंतला मधल्या फळीबाबत विचारले असता तो म्हणाला, आम्ही मधल्या फळीत फारसे प्रयोग करणार नाही. आमचा संघ सर्व खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. मधल्या फळीतील सर्व फलंदाजांना चांगली कामगिरी करण्याचा विश्वास आहे, कारण संघ व्यवस्थापन आम्हाला पाठिंबा देत आहे.

विंडीजमधील खेळपट्ट्यांवर संयम गरजेचा

वेस्ट इंडिजमधील सध्याच्या खेळपट्ट्या या फिरकीपटूंना अनुकूल मानल्या जातात. त्यामुळे या खेळपट्ट्यांवर संयमाने खेळणे गरजेचे आहे, असे रिषभ पंतला वाटते. वेस्ट इंडिजमध्ये संथ खेळपट्ट्या आहेत. मात्र, त्या सपाट नाहीत. या खेळपट्ट्यांवर गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे धावा करण्यासाठी फलंदाजांना संयमाने खेळणे गरजेचे होते, असे पंत म्हणाला.