Denmark Open : श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत  

श्रीकांतने कॅनडाच्या जेसन अँथनी हो-शूईला पराभूत केले.   

किदाम्बी श्रीकांत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सात महिने जगातील सर्व बॅडमिंटन स्पर्धा बंद होत्या. मात्र, सध्या सुरु असलेल्या डेन्मार्क ओपनपासून आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांना पुन्हा सुरुवात झाली आहे. भारताच्या किदाम्बी श्रीकांतने या स्पर्धेच्या माध्यमातून बॅडमिंटन कोर्टवर दमदार पुनरागमन केले आहे. श्रीकांतने आपला दुसऱ्या फेरीतील सामना सरळ गेममध्ये जिंकत डेन्मार्क ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. याआधी श्रीकांतने पहिल्या फेरीतील सामनाही सरळ गेममध्ये जिंकला होता.

श्रीकांतचा आक्रमक खेळ 

दुसऱ्या फेरीच्या सामन्यात श्रीकांतने कॅनडाच्या जेसन अँथनी हो-शूईला २१-१५, २१-१४ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. ३३ मिनिटे चाललेल्या या सामन्यामध्ये पहिल्या गेमच्या मध्यंतराला श्रीकांतकडे ११-८ अशी केवळ तीन गुणांची आघाडी होती. मात्र, त्यानंतर श्रीकांतने त्याचा खेळ उंचावत १७-९ अशी आघाडी मिळवली आणि त्याने हा गेम २१-१५ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्येही मध्यंतराला श्रीकांतकडे ११-८ अशीच आघाडी होती. मात्र, त्यानंतर पुन्हा श्रीकांतने आक्रमक खेळ करत १५-१० अशी आघाडी वाढवली. त्याने अखेर हा गेम २१-१४ असा जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.

हो-शूईने चांगली झुंज दिली

‘हा सामना जिंकल्याचा आनंद आहे. दोन्ही गेममध्ये हो-शूईने मला चांगली झुंज दिली. मध्यंतरापर्यंत आमच्यात फारसा फरक नव्हता. मात्र, त्यानंतर चांगला फॉर्म कायम राखत मला सामना जिंकण्यात यश आले. हो-शूईचे फटके परतवण्यासाठी मला सर्वोत्तम खेळच करावा लागला,’ असे सामन्यानंतर श्रीकांत म्हणाला. श्रीकांतचा आता उपांत्यपूर्व फेरीत दुसऱ्या सीडेड चोऊ टीन चेनशी सामना होईल.