KKR vs SRH : IPL 2020 मध्ये कोलकाताचा डंका, सुपर ओव्हरमध्ये सनरायजर्स पराभूत!

IPL 2020 च्या ३५व्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना कमालीचा उत्कंठावर्धक ठरला. शेवटच्या षटकापर्यंत उत्कंठा ताणल्या गेलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. पहिली बॅटिंग करताना KKR ने विजयासाठी SRH समोर १६४ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. ते पूर्ण करताना सनरायजर्स हैदराबादला १६३ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे सामना टाय झाला आणि सुपर ओव्हरमध्ये गेला. यंदाच्या आयपीएलमध्ये हा तिसरा सुपर ओव्हरचा सामना ठरला. सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या हैदराबादला फक्त २ धावा करता आल्या.विजयासाठी ३ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानावर उतरलेल्या कोलकाताने हे आव्हान अगदी लीलया पार केलं.

विजयासाठी १६४ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या सनरायजर्स हैदराबादच्या (SRH) सलामीवीरांनी तोडीस तोड उत्तर देत ६ ओव्हर्समध्ये ५८ धावांची खणखणीत सलामी दिली. मात्र, केन विल्यम्सन (Kane Williamson) सातव्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर २९ धावांवर बाद झाल्यानंतर सनरायजर्सच्या मधल्या फळीनं हाराकिरी केली. विल्यम्सनच्या पाठोपाठ प्रियम गर्ग (४), जॉनी बेयरस्टो (३६), मनीष पांडे (६) आणि विजय शंकर (७) हे चार फलंदाज ठराविक अंतरानं बाद झाले आणि सनरायजर्सचा डाव संकटात सापडला. दुसरीकडे कर्णधार डेविड वॉर्नरनं एक बाजू लावून धरली होती.

याआधी पहिल्यांदा बॅटिंग करताना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने ५ विकेट्सच्या मोबदल्यात १६३ धावा केल्या. बॅटिंगवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपदावरून पायउतार झालेल्या दिनेश कार्तिकनं (Dinesh Kartik) शेवटच्या षटकांमध्ये १४ बॉलमध्ये २९ धावा फटकावत धावसंख्या १६३ पर्यंत पोहोचवली. सलामीवीर शुभमन गिल (३६) आणि राहुल त्रिपाठी (२३) यांनी ४८ रन्सची दमदार भागीदारी दिल्यानंतर सहाव्या ओव्हरमध्ये नटराजननं राहुल त्रिपाठीचा त्रिफळा उडवला. नितीश राणा देखील २९ धावांची खेळी खेळून धावसंख्येत मोलाची भर घातली. मात्र, ज्याच्या फटकेबाजीची अपेक्षा होती, तो आंद्रे रसेल पुन्हा एकदा अपयशी ठरला. ११ बॉलमध्ये ९ धावा करून रसेल नटराजनच्याच बॉलिंगवर कॅच आऊट झाला. दिनेश कार्तिकनंतर कर्णधारपद स्वीकारलेल्या अयॉन मॉर्गननं २३ चेंडूंमध्ये ३४ धावा करत कर्णधारपदाला साजेशी खेळी केली.