IND vs AUS : ‘हा’ फलंदाज घेऊ शकेल रोहित शर्माची जागा – मॅक्सवेल 

रोहितला एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

team india

भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला पुढील आठवड्यापासून सुरुवात होत असून या दोन संघांमध्ये तीन एकदिवसीय, तीन टी-२० आणि चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. फिटनेसवर प्रश्नचिन्ह असल्यामुळे उपकर्णधार रोहित शर्माला एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघाला रोहितची कमी जाणवेल असे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला वाटते. परंतु, रोहितची जागा घेण्याची क्षमता लोकेश राहुलमध्ये असल्याचेही मॅक्सवेल म्हणाला. रोहितच्या अनुपस्थितीत राहुलची एकदिवसीय आणि टी-२० संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली आहे.

रोहित फारच उत्कृष्ट खेळाडू आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळताना तीन द्विशतके त्याच्या नावावर आहेत. त्यामुळे तो भारतीय संघात नसणे ही प्रतिस्पर्धी संघासाठी आनंदाची बातमी असते. मात्र, त्याची जागा घेऊ शकतील असे खेळाडू भारताकडे आहेत. लोकेश राहुलमध्ये ती क्षमता आहे. त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो सलामीवीर म्हणून खेळो किंवा मधल्या फळीत, तो दमदार खेळ करेल अशी मला अपेक्षा असल्याचे मॅक्सवेल म्हणाला.

यंदा युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत राहुल आणि मॅक्सवेल हे दोघे किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळले होते. तसेच पंजाबच्या संघात मयांक अगरवालचाही समावेश होता. आता रोहितच्या अनुपस्थितीत मयांक आणि शिखर धवन सलामीला येण्याची शक्यता असून राहुल मधल्या फळीत खेळले. मयांक आणि राहुल यांनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली असली तरी ऑस्ट्रेलियात धावा करण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागेल असे मॅक्सवेलला वाटते. आमचे गोलंदाज या दोघांवर आणि भारताच्या सर्वच फलंदाजांवर दबाव टाकतील. ऑस्ट्रेलियात चेंडू अधिक उसळी घेतो आणि सीमारेषाही दूर असते. भारताकडे खूप चांगले फलंदाज आहेत, पण त्यांना धावा करणे सोपे जाणार नाही, असेही मॅक्सवेलने नमूद केले.