IPL 2020: कोहली, एबी यांच्यावर बंदी घालण्याची के.एल. राहुलची मागणी

आयपीएलच्या १३ व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि मधल्या फळीतील फलंदाज एबी डिव्हिलियर्स गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. यंदाच्या मोसमात विरोट कोहली, डिव्हिलियर्स आणि बँगलोरचा संघ फॉर्ममध्ये आहे. आज बँगलोरचा किंग्ज इलेव्हन पंजाबशी सामना आहे. सामन्याच्या एक दिवस आधी पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने विराट कोहली आणि डिव्हिलियर्सला स्पर्धेतून बाद करण्याची मागणी केली आहे.

आजच्या सामन्यापूर्वी बुधवारी सायंकाळी सोशल मीडियावर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी चर्चा केली. या चर्चेवेळी विराटने राहुलला विचारले की, टी २० क्रिकेटमध्ये तुम्हाला कोणता बदल हवा आहे? याला उत्तर देताना राहुलने म्हटलं की, विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या दोघांवर आयपीएल खेळण्याची बंदी घालावी. या दोघांना यानंतर आयपीएल खेळायला देऊ नये, असं राहुल म्हणाला.

केएल राहुलने विनोदी स्वरात विराटला सांगितलं की आयपीएलला मी सांगेन की पुढच्या वर्षी तुमच्यावर आणि एबीवर बंदी घालावी. मला वाटतं तुम्ही आता जास्त धावा केल्या आहेत. आता तुम्हाला दुसरं काही तरी करण्याची गरज आहे. आयपीएलच्या गेल्या दोन हंगामात बँगलोरचा संघ गुणतालिकेत तळाला होता. मात्र, यंदाच्या मोसमात चांगल्या फॉर्ममध्ये आहे. युएईमध्ये विराटच्या नेतृत्वात बँगलोरचा संघ चांगली कामगिरी करत आहे. मात्र, पंजाबला चांगली कामगिरी करता आलेली नाही. गुणतालिकेत पंजाब तळाला आहे.