भारताकडून खेळताना लोकेश राहुलने यष्टिरक्षण करू नये – ब्रायन लारा 

राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि न्यूझीलंड दौऱ्यात चांगली कामगिरी केली.  

KL Rahul
लोकेश राहुल

लोकेश राहुल हा अप्रतिम फलंदाज असून त्याने भारतीय संघाकडून खेळताना यष्टिरक्षण करू नये, असे मत वेस्ट इंडियाचा महान फलंदाज ब्रायन लाराने व्यक्त केले. यष्टिरक्षण केल्यामुळे राहुलवर अतिरिक्त ताण पडेल असे लाराला वाटते. भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय वर्ल्डकपनंतर भारताकडून खेळला नव्हता. तर त्याने ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. त्याची जागा घेण्यासाठी भारतीय संघ युवा रिषभ पंतचा विचार करत होता. मात्र, पंतला मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही. त्यामुळे त्याच्या जागी लोकेश राहुलने एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये यष्टिरक्षणाची धुरा सांभाळली. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि न्यूझीलंड दौऱ्यात चांगली कामगिरी केली. मात्र, त्याने यापुढे यष्टिरक्षण करणे टाळले पाहिजे, असे लाराला वाटते.

फलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे

भारतीय संघाकडून खेळताना लोकेश राहुलने यष्टीरक्षणाची चिंता करु नये. राहुल अप्रतिम फलंदाज आहे. त्यामुळे राहुलने फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि जास्तीतजास्त धावा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे लाराने सांगितले. तसेच रिषभ पंतला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले असले तरी त्याला आणखी संधी मिळायला हवी असेही लारा म्हणाला. राहुल आणि पंत हे सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्मात आहेत. आतापर्यंत राहुलने पाच सामन्यांत ३०२ धावा केल्या असून पंतला १७१ धावा करता आल्या आहेत.