घरक्रीडाकोहली, बुमराहच नंबर वन!

कोहली, बुमराहच नंबर वन!

Subscribe

जागतिक एकदिवसीय क्रमवारी

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आयसीसी जागतिक एकदिवसीय क्रमवारीतील अनुक्रमे फलंदाज आणि गोलंदाजांच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या क्रमवारीत भारताचा सलामीवीर रोहित शर्मा फलंदाजांच्या यादीत दुसर्‍या स्थानी आहे. रोहितने यावर्षी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत अप्रतिम कामगिरी केली आहे.

सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जाणारा कोहली फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर असून त्याच्या खात्यात ८९५ गुण आहेत. दुसर्‍या स्थानावरील रोहितचे ८६३ गुण आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये ३२ गुणांचा फरक आहे. पाकिस्तानचा बाबर आझम ८३४ गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे.

- Advertisement -

गोलंदाजांमध्ये बुमराहला अव्वल स्थान राखण्यात यश आले. त्याच्या खात्यात ७९७ गुण, तर दुसर्‍या स्थानी असणार्‍या न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टच्या खात्यात ७४० गुण आहेत. अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमानला एका स्थानाची बढती मिळाली असून तो ७०७ गुणांसह तिसर्‍या स्थानावर पोहोचला आहे.

अष्टपैलू खेळाडूंमध्ये भारताचा हार्दिक पांड्या दहाव्या स्थानावर असून त्याचे २४६ गुण आहेत. या यादीत इंग्लंडचा बेन स्टोक्स ३१९ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -