कोहलीकडून मिळते प्रेरणा!

हनुमा विहारीचे विधान

Mumbai

भारताचा फलंदाज हनुमा विहारीने नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने या मालिकेच्या चार डावांमध्ये भारताकडून सर्वाधिक २८९ धावा केल्या. या मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात विहारीने सहाव्या क्रमांकावर खेळताना १११ आणि नाबाद ५३ धावांची खेळी केली. सहाव्या क्रमांकावर खेळताना एकाच कसोटीत एक शतक आणि एक अर्धशतक झळकावणारा विहारी हा सचिन तेंडुलकरनंतरचा (१९९०) दुसरा भारतीय फलंदाज होता. त्याच्या या कामगिरीमुळे कर्णधार विराट कोहलीने त्याची स्तुती केली होती. आता विहारीने कर्णधार कोहलीची स्तुती केली आहे.

भारतीय संघातील इतर खेळाडूंना, खासकरून युवकांना कोहलीकडून प्रेरणा मिळते. तो मैदानात आणि मैदानाबाहेरही खूप मेहनत घेतो. तो आमचा आदर्श आहे. आम्ही त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो, असे विहारीने एका मुलाखतीत सांगितले.

विहारीने विंडीजविरुद्धच्या मालिकेत अजिंक्य रहाणेसोबत चांगली भागीदारी केली. कोहली आणि रहाणेसोबत खेळताना काय फरक जाणवतो असे विचारले असता विहारी म्हणाला, दोघांची खेळण्याची पद्धत खूप वेगळी आहे. तसेच कोहली नेहमी आपल्या भावना व्यक्त करतो, तर अजिंक्य शांत असतो. त्याला स्वतःच्या पद्धतीने गोष्टी करायला आवडतात. मला दोघांसोबतही फलंदाजी करताना मजा येते. अजिंक्य आणि मी गोलंदाज काय करण्याचा प्रयत्न करत आहे याबाबत चर्चा करत राहतो. विंडीजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अजिंक्य मला खूप पाठिंबा देत होता. त्याने मला नैसर्गिक खेळ करण्यासाठी प्रोत्साहन दिले.