घरक्रीडाकोहली पुन्हा नंबर वन!

कोहली पुन्हा नंबर वन!

Subscribe

जागतिक कसोटी क्रमवारी

भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला मागे टाकत जागतिक कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या क्रमवारीनुसार भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने चौथे स्थान कायम राखले, पण अजिंक्य रहाणेची एका स्थानाची घसरण झाली असून तो सहाव्या स्थानी पोहोचला आहे. गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह पाचव्या स्थानावर कायम आहे.

कोहली आणि स्मिथ हे सध्याच्या घडीला जगातील दोन सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखले जातात. या दोघांमध्ये मागील काही वर्षांत अव्वल क्रमांकासाठी चढाओढ पाहायला मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अ‍ॅशेस मालिकेच्या ४ सामन्यांत स्मिथने ११०.५७ च्या सरासरीने ७७४ धावा केल्या होत्या. यामध्ये १ द्विशतक, २ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. या कामगिरीमुळे त्याने अव्वल स्थानी झेप घेतली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या दोन डावांत मिळून त्याला केवळ ४० धावाच करता आल्या. याउलट कोहलीने कोलकात्यात झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत १३६ धावांची अप्रतिम खेळी केली. त्यामुळे अव्वल स्थानी असणार्‍या कोहलीच्या खात्यात आता ९२८ गुण झाले असून दुसर्‍या स्थानावरील स्मिथचे ९२३ गुण आहेत. कोहली आणि स्मिथ यांच्यात आता पाच गुणांचे अंतर आहे.

- Advertisement -

पाकिस्तानविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीत नाबाद ३३५ धावांची खेळी करणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरला १२ स्थानांची बढती मिळाली असून त्याने थेट पाचव्या स्थानी झेप घेतली. या मालिकेच्या दोन्ही सामन्यांत शतके करणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लबुसचेंगने पहिल्यांदा अव्वल दहा फलंदाजांमध्ये प्रवेश मिळवला आहे. आठव्या स्थानी असणार्‍या लबुसचेंगच्या खात्यात सध्या ७३१ गुण आहेत. या मालिकेत पाकिस्तानच्या बाबर आझमने पहिल्या कसोटीच्या दुसर्‍या डावात १०४, तर दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या डावात ९७ धावांची झुंजार खेळी केली. त्यामुळे त्याला दोन स्थानांची बढती मिळाली. तो सध्या ६९८ गुणांसह १३ व्या स्थानी आहे. तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीत २२६ धावांची खेळी करणार्‍या इंग्लंडच्या जो रुटने ११ व्या स्थानावरून सातव्या स्थानी झेप घेतली आहे.

तीन भारतीय गोलंदाज अव्वल दहामध्ये!

जागतिक कसोटी क्रमवारीतील गोलंदाजांच्या यादीत तीन भारतीय अव्वल दहामध्ये आहेत. सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा जसप्रीत बुमराह ७९४ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला मागील काही महिने मैदानाबाहेर रहावे लागले आहे. तो वेस्ट इंडिज आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही खेळू शकला नाही. मात्र, तो पुढील वर्षीच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध पुनरागमन करण्याची शक्यता आहे. भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (७७२ गुण) आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (७७१ गुण) क्रमवारीत अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानी आहे. शमीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांत मिळून १३ गडी, तर बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामन्यांत मिळून ९ गडी बाद केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -