कुलदीप यादवची दुसर्‍या स्थानी झेप

आयसीसी टी-२० क्रमवारी

Mumbai
kuldeep-yadav
कुलदीप यादव

भारताचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने आयसीसीच्या गोलंदाजांच्या टी-२० क्रमवारीत दुसर्‍या स्थानी झेप घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत संधी न मिळालेल्या कुलदीपने तिसर्‍या सामन्यात २ महत्त्वपूर्ण विकेट मिळवल्या होत्या. त्यामुळे त्याला एका स्थानाची बढती मिळाली आहे, तर न्यूझीलंडविरुद्धची ३ सामन्यांची मालिका २-१ अशी गमावणार्‍या भारताच्या गुणांमध्ये घट झाली आहे.

तिसर्‍या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचे सलामीवीर टीम सायफर्ट आणि कॉलिन मुनरो यांनी डावाची आक्रमक सुरुवात केली होती, पण कुलदीपने या दोघानांही आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले होते. त्याच्या या सामन्यातील चांगल्या कामगिरीमुळेच त्याने दुसर्‍या झेप घेतली आहे. ही त्याची टी-२० कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी आहे. कुलदीपच्या खात्यात सध्या ७२८ गुण जमा आहेत, तर अव्वल स्थानी असलेल्या अफगाणिस्तानच्या राशिद खानच्या खात्यात ७९३ गुण आहेत. त्याने कुलदीप राशिदपेक्षा ६५ गुणांनी मागे आहे. या क्रमवारीत तिसर्‍या स्थानी पाकिस्तानचा लेगस्पिनर शादाब खान आहे.

फलंदाजांमध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोघांनाही क्रमवारीत बढती मिळाली आहे. रोहित १० व्या स्थानावरून ७ व्या स्थानी तर धवन १२ व्या स्थानावरून ११ व्या स्थानी आला आहे, तसेच अष्टपैलूंमध्ये कृणाल पांड्याच्या खात्यात ३९ गुणांची वाढ झाली असून, तो कारकिर्दीतील सर्वोत्तम ५८ व्या स्थानी पोहोचला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पराभवामुळे भारतीय संघाच्या गुणांमध्ये घट झाली आहे. त्यांचे २ गुण कमी झाले असून, सध्या भारत १२४ गुणांवर आहे, तर पाकिस्तानला द.आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे ३ गुण कमी झाले आहेत. असे असले तरी दोन्ही संघाच्या क्रमवारीत फरक पडलेला नसून पाकिस्तान आणि भारत अनुक्रमे पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकावर आहे.

तिसर्‍या टी-२० सामन्यात ७२ धावांची अप्रतिम खेळी करणार्‍या न्यूझीलंडच्या कॉलिन मुनरोला क्रमवारीत बढती मिळाली आहे. तो तिसर्‍या स्थानावरून दुसर्‍या स्थानी आला आहे. त्याच्या खात्यात ८२५ गुण आहेत, तसेच मालिकाविराचा पुरस्कार मिळवणारा टीम सायफर्ट ८३ व्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडने ही मालिका जिंकली असली तरी त्यांना क्रमवारीत बढती मिळालेली नाही. ते ११६ गुणांसह सहाव्या स्थानी आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here