KXIP vs MI : २ Super Over च्या रोमांचक लढतीत पंजाब ठरली अव्वल, मुंबई पराभूत

किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात तुफानी रोमांचक ठरलेल्या सामन्यात २ सुपर ओव्हर झाल्या. आधी सामना टाय झाला. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये देखील दोन्ही टीमचे रन समानच राहिल्यामुळे पुन्हा दुसरी सुपर ओव्हर घेण्यात आली. दोन सुपर ओव्हरपर्यंत गेलेल्या या सामन्यात अखेर मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. त्यासोबतच किंग्ज इलेव्हन पंजाबनं Point Table मध्ये २ गुणांची कमाई केली आहे. विजयासाठी पंजाबला १७७ धावा करायच्या असताना २० ओव्हरमध्ये पंजाबला १७६ धावाच करता आल्या. टाय मॅचमुळे दिवसातली दुसरी सुपर ओव्हर झाली. आयपीएलच्या इतिहासात एकाच दिवसात दोन सुपर ओव्हर होण्याचा पहिलाच प्रसंग होता. सुपर ओव्हरमध्ये पंजाबला अवघ्या ५ धावा करता आल्या. जसप्रीत बुमराहने टिच्चून बॉलिंग केल्यामुळे पंजाबला फटकेबाजी करता आली नाही. मात्र, त्यानंतर पंजाबच्या मोहम्मद शमीने देखील टिच्चून बॉलिंग करत मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉकला रोखून धरलं आणि पुन्हा एक सुपर ओव्हर घेण्याची वेळ आली.

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्या आणि कायरन पोलार्डला ११ धावांवर रोखण्यात जॉर्डनला यश आलं. त्यानंतर पंजाबकडून ख्रिस गेल आणि मयांक अगरवाल मैदानात उतरले. पहिल्याच बॉलवर ख्रिस गेलने षटकार खेचत मॅच पंजाबच्या बाजूने झुकवली. पुढच्या बॉलवर गेलनं सिंगल घेतला. पण पुढच्याच बॉलवर मयांक अगरवालनं चौकार खेचत सामना पंजाबच्या खिशात घातला.

विजयासाठी १७७ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबनं देखील चौथ्या ओव्हरमध्ये मयांक अगरवालची (११) विकेट गमावली. त्यानंतर आलेल्या ख्रिस गेलने २४ धावांची भर घातल्यानंतर पव्हेलियनचा रस्ता धरला. राहुल चहरच्या बॉलिंगवर बोल्टनं त्याचा झेल टिपला. निकोलस पूरनला (२४) देखील चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. यंदाच्या आयपीएलमधला सर्वात महाग खेळाडू ठरलेल्या मॅक्सवेलला याही सामन्यात धावा बनवण्यात अपयश आलं. मॅक्सवेल शून्यावर बाद झाल्यानंतर आलेल्या जॉर्डननं (१३) दीपक हुड्डासोबत (२३) धावांचा पाठलाग केला खरा. मात्र, शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेला हा सामना शेवटी टाय झाला आणि दिवसातली दुसरी सुपर ओव्हर क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळाली.

पहिली बॅटिंग करताना मुंबई इंडियन्सनं (MI) किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर (KXIP) विजयासाठी १७६ धावांचं भलामोठा डोंगर उभा केला. मुंबईच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. तिसऱ्याच ओव्हरमध्ये कर्णधार रोहित शर्मा अवघ्या ९ रन्सवर आऊट झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव (०) आणि इशान किशन (७) स्वस्तात माघारी परतल्यानंतर सलामीला आलेल्या क्विंटन डिकॉकनं (५३) कृणाल पंड्याला साथीला घेऊन मुंबई इंडियन्सच्या डावाला आकार द्यायला सुरुवात केली. मुंबईची धावसंख्या ९६ वर असताना कृणाल पंड्या ३४ धावांवर आऊट झाला. पुढच्याच ओव्हरमध्ये मोहम्मद शमीनं ८ रनांवर माघारी धाडलं. १७व्या ओव्हरमध्ये जॉर्डननं धोकादायक क्विंटन डिकॉकला बाद केलं. त्यानंतर मात्र कायरन पोलार्डनं अवघ्या १२ बॉलमध्ये ३४ धावा आणि कुल्टरनाईलनं १२ बॉलमध्ये २४ रन्स फटकावत संघाची धावसंख्या १७६ पर्यंत पोहोचवली.