मेस्सीची ३४ वी हॅट्ट्रिक; रोनाल्डोशी बरोबरी

ला लिगा फुटबॉल स्पर्धा

बार्सिलोनाचा सुपरस्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने रविवारी स्पेनमधील स्पर्धा ‘ला लिगा’मध्ये आपली ३४ वी हॅट्ट्रिक केली. या कामगिरीमुळे त्याने रियाल माद्रिदचा माजी खेळाडू क्रिस्तिआनो रोनाल्डोशी बरोबरी केली. आता इटालियन संघ ज्युव्हेंट्सकडून खेळणार्‍या रोनाल्डोने माद्रिदकडून खेळताना ‘ला लिगा’मध्ये ३४ हॅट्ट्रिक केल्या होत्या. मेस्सीच्या हॅट्ट्रिकमुळे बार्सिलोनाने सेल्टा विगो संघाचा ४-१ असा पराभव केला.

या सामन्याच्या २३ व्या मिनिटाला बार्सिलोनाला पेनल्टी मिळाली, ज्यावर मेस्सीने आपला आणि संघाचा पहिला गोल केला. त्यानंतर मेस्सीने ४५+१ आणि ४८ व्या मिनिटाला आपला अनुक्रमे दुसरा आणि तिसरा गोल केला. सर्जिओ बस्केट्सने बार्सिलोनाकडून चौथा गोल केला.

दुसरीकडे रियाल माद्रिदने आयबर संघाचा ४-० असा धुव्वा उडवला. त्यांच्याकडून करीम बेंझमा (१७ आणि २९ वे मिनिट), सर्जिओ रॅमोस (२० वे मिनिट) आणि फेडरिको वाल्व्हर्डे (६१ वे मिनिट) यांनी गोल केले. रियाल आणि बार्सिलोना या दोन्ही संघांचे १२ सामन्यांनंतर २५ गुण आहेत. मात्र, बार्सिलोना चांगल्या गोल सरासरीमुळे गुणतक्त्यात अव्वल स्थानावर आहे.