Denmark Open : लक्ष्य सेन दुसऱ्या फेरीत पराभूत

या सामन्यात लक्ष्यला सर्वोत्तम खेळ करता आला नाही.   

lakshya sen
लक्ष्य सेन

भारताचा युवा खेळाडू लक्ष्य सेनला डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्याला डेन्मार्कच्या हांस-क्रिस्टियन सोलबर्ग विटिंगहॉसने २१-१५, ७-२१, १७-२१ असे पराभूत केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, जगातील सर्व बॅडमिंटन स्पर्धा सात महिने बंद होत्या. मात्र, सध्या सुरु असलेल्या डेन्मार्क ओपनपासून आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांना पुन्हा सुरुवात झाली असून लक्ष्यने या स्पर्धेची चांगली सुरुवात केली होती. त्याने पहिल्या फेरीतील सामना सरळ गेममध्ये जिंकला होता. दुसऱ्या फेरीत मात्र लक्ष्यला त्याचा सर्वोत्तम खेळ करता आला नाही.

लक्ष्यने बऱ्याच चुका केल्या

डेन्मार्क ओपनच्या दुसऱ्या फेरीत लक्ष्य सेनला हांस-क्रिस्टियन सोलबर्ग विटिंगहॉसने २१-१५, ७-२१, १७-२१ असे पराभूत केले. या सामन्याची लक्ष्यने दमदार सुरुवात केली होती. त्याने पहिला गेम २१-१५ असा जिंकला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये त्याचा खेळ खालावला. याचा विटिंगहॉसने फायदा घेतला. लक्ष्यने या गेममध्ये बऱ्याच चुका केल्या. त्यामुळे सुरुवातीलाच विटिंगहॉसला ८-० अशी आघाडी मिळाली. यानंतर लक्ष्यला पुनरागमन करता आले नाही आणि विटिंगहॉसने हा गेम २१-७ असा जिंकला. तिसऱ्या गेममध्येही लक्ष्य सुरुवातीपासूनच पिछाडीवर पडला. विटिंगहॉसने १-७ अशी आघाडी घेतली, पण यानंतर लक्ष्यने पुनरागमन करत विटिंगहॉसची आघाडी ८-९ अशी कमी केली. तसेच त्याने गेममध्ये १५-१५ अशी बरोबरीही केली. यानंतर मात्र विटिंगहॉसने ८ पैकी ६ गुण जिंकत हा गेमही जिंकला.