घरक्रीडामहाराष्ट्राचे खो-खो संघ बाद फेरीत

महाराष्ट्राचे खो-खो संघ बाद फेरीत

Subscribe

महाराष्ट्राच्या २१ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील मुले-मुलींच्या संघाने खेलो इंडियाच्या खो-खो स्पर्धेची बाद फेरी गाठली आहे. तर वेटलिफ्टिंगमध्ये भाजी विक्रेत्याची मुलगी वैष्णवी पवारने सुवर्ण कामगिरी केली.

महाराष्ट्राच्या २१ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील मुले-मुलींच्या संघाने खेलो इंडियाच्या खो-खो स्पर्धेची बाद फेरी गाठली आहे. तर वेटलिफ्टिंगमध्ये भाजी विक्रेत्याची मुलगी वैष्णवी पवारने सुवर्ण कामगिरी केली. तसेच महाराष्ट्राच्या आकाश गोरखा, मितिका गुणेले, संगीता रुमाले या खेळाडूंनी बॉक्सिंगमध्ये विजयी वाटचाल राखली.

खो-खो स्पर्धेत २१ वर्षांखालील मुलांमध्ये महाराष्ट्राने तामिळनाडूचा पराभव केला. महाराष्ट्राकडून संकेत कदम (३ मि. संरक्षण, ३ गडी), अरुण गुणके (२ मि.५० सेकंद संरक्षण, ३ गडी) यांंनी उल्लेखनीय कामगिरी केली. २१ वर्षांखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राने दिल्लीचा १२-७ असा एक डाव पाच गुणांनी पराभव केला. त्यांच्याकडून निकिता पवार (३ मि. संरक्षण, १ गडी), प्रियंका भोपी (५ मि. संरक्षण, १ गडी), अपेक्षा सुतार (२ मिनिटे व २ गडी) यांनी चांगली कामगिरी केली. १७ वर्षांखालील मुलांमध्ये महाराष्ट्राने दिल्लीचा १४-९ असा पराभव केला. मुलींच्या १७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राने तामिळनाडूचा १३-९ असा पराभव केला. महाराष्ट्राकडून सृष्टी शिंदे (२ मि. २० सेकंद), किरण शिंदे (३ मि.), रितीका मगदूग (३ गडी) यांनी चांगला खेळ केला.

- Advertisement -

वेटलिफ्टिंगमध्ये सातारा येथील भाजी विक्रेत्याची मुलगी वैष्णवी पवारने ८१ किलो गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिने स्नॅच तसेच क्लीन आणि जर्कमध्ये एकूण ११४ किलो वजन उचलले. वैष्णवी ही सातारा येथील अनंत इंग्लिश शाळेत इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. तिने पाचव्या इयत्तेपासून या खेळाच्या सरावास प्रारंभ केला. कबड्डीमध्ये महाराष्ट्राला मुलींच्या विभागात संमिश्र यश मिळाले. २१ वर्षांखालील मुलींमध्ये महाराष्ट्राने पश्चिम बंगालचा ३३ – २७ असा पराभव केला. महाराष्ट्राकडून सोनाली हेळवी, सृष्टी चाळके व आसावरी कचरे यांनी दमदार खेळ केला. तर १७ वर्षांखालील मुलींच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर प्रदेशने महाराष्ट्राचा ३१-३० असा पराभव केला. या सामन्यात शेवटचे एक मिनिट बाकी असताना उत्तर प्रदेशकडे ३०-२८ अशी आघाडी असताना महाराष्ट्राने दोन गुण मिळवत ३०-३० अशी बरोबरी साधली. मात्र सामना संपल्याची शिट्टी वाजल्यानंतर पंचांनी उत्तर प्रदेशला एक तांत्रिक गुण दिल्यामुळे त्यांचा विजय झाला.

बॉक्सिंगमध्ये महाराष्ट्राच्या आकाश गोरखा, मितिका गुणेले, संगीता रुमाले या खेळाडूंनी विजय मिळवला. आकाश गोरखाने १७ वर्षांखालील मुलांच्या फेदरवेट विभागात मणिपूरच्या लायशानग्बम सिंग याच्यावर ४-१ अशी मात केली. तर मुलींच्या लाईटवेट गटात महाराष्ट्राच्या सना गोन्साल्विसने मिझोरामच्या रुडी लाल्मिंगुनीचा पराभव केला. ६३ किलो विभागात महाराष्ट्राच्या सुप्रिया मिश्रा हिला रुद्र्रिका कुंडु या हरयाणाच्या खेळाडूकडून पुढे चाल मिळाली. ६६ किलो गटात मितिका गुणेले हिने उत्तराखंडच्या लकी राणा हिच्यावर विजय मिळविला. ५४ किलो गटात संगीता रुमालेने विजयी घोडदौड राखताना मध्यप्रदेशच्या दिव्या पवारला ४-१ असे पराभूत केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -