घरक्रीडानाशिकच्या मातीतील मल्लाने घडवला इतिहास!

नाशिकच्या मातीतील मल्लाने घडवला इतिहास!

Subscribe

२०१४ मधील उणिव भरून काढली, पहिला ‘महाराष्ट्र केसरी’

नाशिकमधील भगूरच्या बलकवडे व्यायामशाळेत लहानपणापासूनच कुस्तीचे धडे गिरवणार्‍या हर्षवर्धन सदगीरने महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीत लातूरच्या शैलेश शेळकेला चारीमुंड्या चित करत मानाची गदा पटकावली. त्याच्या रूपात नाशिककरांना तब्बल सहा दशकांनंतर पहिला ‘महाराष्ट्र केसरी’ मिळाला. नाशिकच्या मातीतील या मल्लाने इतिहास रचताच शहरासह भगूर व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. हर्षवर्धनने बलकवडे व्यायामशाळेचेच नव्हे, तर नाशिकचे नाव उंचावल्याचा अन् स्वप्नपूर्ती केल्याचा अभिमान वाटतोय, अशी प्रतिक्रिया प्रशिक्षक गोरख बलकवडे यांनी ‘आपलं महानगर’ला दिली.

पंचवीस वर्षांपूर्वी येवल्याच्या राजू लोणारी यांनी महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारून नाशिककरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र, महाराष्ट्र केसरी होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नव्हते. यंदा मात्र भगूरच्या हर्षवर्धनने स्वत:सह नाशिककरांचे हे स्वप्न पूर्ण करून दाखवले. गादी विभागाच्या अंतिम लढतीत माजी महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेला नमवून किताबासाठीच्या लढतीत धडक मारत हर्षवर्धनने या स्पर्धेतील विजेतेपदासाठीची दावेदारी निश्चित केली होती.

- Advertisement -

मूळचा अकोले तालुक्यातील कुंभाळणे गावातील हर्षवर्धन, वयाच्या अकराव्या वर्षी भगूरच्या बलकवडे व्यायामशाळेत दाखल झाला. तेव्हाचे नाशिक जिल्हा तालीम संघ अध्यक्ष गोरख बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. त्याचे वडील शाळेत लिपिक. महाराष्ट्र केसरीत सलग तीन वेळा कांस्यपदक पटकावलेल्या राष्ट्रीय मल्ल, प्रशिक्षक विशाल बलकवडे यांच्या प्रशिक्षणात हर्षवर्धनने प्राथमिक धडे गिरवले. याच वयात त्याने शालेय कुस्ती स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावत चुणूक दाखवून दिली. त्याची आक्रमक शैली भविष्यातील ‘केसरी’ची जाणीव करून देत होती.

करंजाळीमध्ये (ता. पेठ) त्याने महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला. यावेळी महाविद्यालयीन स्तरावरच नव्हे, तर विद्यापीठ, राज्य स्तरावरही त्याने आपल्या आक्रमकत शैलीमुळे सतत मैदाने गाजवायला सुरुवात केली. विशेष म्हणजे, त्याने कामगिरीत सातत्य राखत २०१४ मध्ये उत्तर महाराष्ट्र श्री स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. यानंतर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागाच्या उद्देशातून त्याने पुण्यात प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवला. या ठिकाणी त्याने अधिक चांगली मेहनत घेऊन अनेक स्पर्धांमध्ये आपले वर्चस्व गाजवले. आता नवीन वर्षात हर्षवर्धनने ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावून नाशिककरांना ऐतिहासिक भेट दिल्याची प्रतिक्रिया क्रीडा वर्तुळात व्यक्त होत आहे.

- Advertisement -

नाशिककरांचा जल्लोष!
अवघ्या काही मिनिटांत प्रतिस्पर्धांना धूळ चारणार्‍या हर्षवर्धनची आक्रमक शैली हीच ताकद! सध्या पुण्यातील अकादमीत प्रशिक्षक काका पवार यांच्या तालमीत घाम गाळणार्‍या हर्षवर्धनने माजी विजेता कटकेला पराभूत करत किताबाच्या लढतीत धडक दिली. त्यामुळे मंगळवारी सकाळपासूनच नाशिकसह पेठ, हरसूल, भगूर व विविध व्यायामशाळांमध्ये मोठ्या स्क्रिनवर कुस्तीप्रेमींची नजर खिळून होती. सामना अपेक्षेनुसार हर्षवर्धनकडे झुकताच स्क्रिनसमोर गर्दी वाढू लागली होती. अखेर विजेतेपदावर शिक्कामोर्तब होताच नाशिककरांनी एकच जल्लोष केला. हर्षवर्धनच्या या ऐतिहासिक कामगिरीचे कुस्ती प्रशिक्षक, खेळाडू, क्रीडाप्रेमींनी स्वागत केले.

अभिमानास्पद कामगिरी
नाशिकच्या मातीतील असल्याने आणि माझ्या तालमीत लहानपणी व्यायाम, कुस्तीचे धडे गिरवल्याने हर्षवर्धनच्या प्रत्येक सामन्यावर आमची नजर असते. आज पुणे अकादमीत प्रशिक्षण घेत असला तरी नाशिककर या नात्याने त्याच्या यंदाच्या या स्पर्धेतील कामगिरीकडे माझ्यासह प्रत्येक नाशिककराचे लक्ष लागून होते. आपल्या आक्रमक शैलीत खेळत शैलेशला पराभूत करणार्‍या हर्षवर्धनने नाशिककरांचे साठ वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याची ही कामगिरी खरोखरच अभिमानास्पद आहे.
– गोरख बलकवडे, माजी कुस्तीपटू-प्रशिक्षक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -