घरक्रीडाकुस्तीला राष्ट्रीय खेळ बनवा -बजरंग पुनिया

कुस्तीला राष्ट्रीय खेळ बनवा -बजरंग पुनिया

Subscribe

कुस्तीला भारताचा राष्ट्रीय खेळ बनवा, अशी मागणी मंगळवारी तीन वेळचा विश्वविजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने केली. बजरंगसह भारताच्या कुस्तीपटूंनी मागील काही वर्षांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एकूण पाच पदके पटकावली, जी भारताची जागतिक स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी होती. या स्पर्धेत बजरंगने कांस्यपदक मिळवले. या स्पर्धेत पदके मिळवणार्‍या कुस्तीपटूंचा सोमवारी क्रीडामंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

त्यावेळी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिज भूषण शरण यांनी कुस्तीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा देता येईल असे म्हटले होते, ज्याला दोनवेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशील कुमारने पाठिंबा दर्शवला होता. या दोघांशी बजरंग सहमत आहे. मलाही वाटते की, कुस्तीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा दिला पाहिजे. कुस्ती हा असा खेळ आहे, ज्याने भारताला जागतिक स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्ये बरीच पदके मिळवून दिली आहेत, असे बजरंग म्हणाला.

- Advertisement -

रिजिजू मात्र मी पक्षपात करू शकत नाही आणि कोणत्याही खेळाला झुकते माप देऊ शकत नाही असे म्हणाले. क्रीडामंत्री म्हणून मी सर्व खेळांना समान महत्त्व देतो. मी पक्षपात करू शकत नाही. कुस्तीला भारतात खूप महत्त्व आहे. मात्र, आपण सर्वच ऑलिम्पिक खेळांना आणि जे खेळ ऑलिम्पिकमध्ये खेळले जात नाहीत, त्यांनाही महत्त्व दिले पाहिजे. कोणीतरी मागणी करत आहे, म्हणून मी एखाद्या खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा देऊ शकत नाही. त्यामुळे मला या विषयावर चर्चा करायची नाही, असे रिजिजू यांनी स्पष्ट केले.

‘तो’ पराभव कधीही विसरणार नाही!
जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत बजरंग पुनियाने कांस्यपदक मिळवले. परंतु, त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीच्या वादग्रस्त सामन्यात त्याचा पराभव झाला. या सामन्यात पंचांनी प्रतिस्पर्धी दौलत नियाझ्बेकोव्हला श्वास घेण्यासाठी पुरेशी संधी दिल्यामुळे बजरंगने नाराजी व्यक्त केली होती. या सामन्यातील पराभव मी कधीही विसरणार नाही, असे बजरंग म्हणाला. पक्षपातामुळे किंवा खोटेपणा करून जेव्हा दुसरा खेळाडू जिंकतो, तेव्हा खूप निराशा येते. माझ्या चुकीमुळे माझे सुवर्णपदक हुकले नाही. जागतिक स्पर्धा आणि ऑलिम्पिक या दोन वेगळ्या स्पर्धा आहेत. मी ऑलिम्पिकसाठी खूप मेहनत घेत आहे आणि जागतिक स्पर्धेसाठीही कसून सराव केला होता. त्यामुळे मला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले तरीही मी जागतिक स्पर्धेतील पराभव विसरू शकणार नाही, असेही बजरंग म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -