घरक्रीडामलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा

मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा

Subscribe

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांमधील आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधूला दुसर्‍या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे श्रीकांत हा एकमेव भारतीय खेळाडू या स्पर्धेत शिल्लक आहे.

महिला एकेरीच्या दुसर्‍या फेरीतील सामन्यात पाचव्या सीडेड पी. व्ही. सिंधूचा जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या सुंग जी ह्युनने २१-१८, २१-७ असे पराभूत केले. सुंगने सिंधूचा काही दिवसांपूर्वी झालेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभव केला होता. मलेशिया ओपनच्या दुसर्‍या फेरीतील सामन्याची सुरुवात सिंधूने चांगली केली होती. पहिल्या गेममध्ये तिच्याकडे १३-१० अशी आघाडीही होती.

- Advertisement -

मात्र, त्यानंतर सुंगने आक्रमक खेळ करण्यास सुरुवात करत पुढील ७ पैकी ६ गुण मिळवत १६-१४ अशी आघाडी घेतली. तिने पुढेही आपला चांगला खेळ सुरु ठेवत हा गेम २१-१८ असा जिंकला. दुसर्‍या गेमची सुरुवात सुंगने पुन्हा आक्रमक खेळ करत केली आणि मध्यांतराला ११-६ अशी आघाडी मिळवली. मध्यांतरानंतर सिंधूचा खेळ अधिकच खालावला. सुंगने पुढील ११ पैकी १० गुण मिळवत हा गेम २१-७ असा जिंकत हा सामनाही जिंकला आणि सिंधूला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.

पुरुष एकेरीत भारताच्या किदाम्बी श्रीकांतने थायलंडच्या खोसीत फेटप्राडबवर २१-११, २१-१५ अशी मात केली. या सामन्याचा पहिला गेम श्रीकांतने अगदी सहजपणे जिंकला. मात्र दुसर्‍या गेममध्ये खोसीतने चांगली झुंज दिली. मात्र, श्रीकांतने आपला खेळ उंचावत हा गेमही जिंकला. आता उपांत्यपूर्व फेरीत त्याचा ऑलिम्पिक चॅम्पियन आणि चौथ्या सीडेड चीनच्या चेन लाँगशी सामना होईल.

- Advertisement -

प्रणव-सिक्कीही पराभूत

मिश्र दुहेरीत भारताच्या प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डी या जोडीचाही पराभव झाला. त्यांना मलेशियाच्या टॅन कियान मेंग आणि लाई पेई जिंग या जोडीने २१-१५, १७-२१, १३-२१ असे पराभूत केले. या सामन्याचा पहिला गेम प्रणव-सिक्की जोडीने २१-१५ असा जिंकला. मात्र, दुसर्‍या व तिसर्‍या सेटमध्ये त्यांना चांगला खेळ करता आला नाही आणि त्यांच्यावर स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की ओढवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -