माम्बा आऊट!

Mumbai

मी शरीराने जगात नसलो म्हणजे माझा अंत नाही, मी एक कधीही न विसरता येणारा प्रवास आहे, हे श्री चिन्मय यांचे सुंदर वाक्य महान बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटला अगदी योग्यपणे लागू होते. कोबीचे मागील रविवारी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. आपल्या ४१ वर्षांच्या आयुष्यात कोबीने जे यश बास्केटबॉल कोर्टवर आणि कोर्टबाहेर मिळवले, ते क्वचितच कोणाला जमले असेल. त्यामुळे तो आणि त्याची कामगिरी येणार्‍या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, यात तिळमात्रही शंका नाही.

माम्बा आऊट, हे आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यानंतर महान बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटने उच्चारलेले अखेरचे दोन शब्द! या शब्दांची पुन्हा मागील रविवारी आठवण झाली. लॉस अँजेलिसजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात कोबी, त्याची १३ वर्षांची मुलगी जियाना आणि अन्य सात जणांचे निधन झाले. कोबीचे निधन झाल्याचे कळल्यानंतर जगभरातील त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्याला सोशल मीडियावरून अनेकांनी आदरांजली वाहिली आणि यापैकी प्रत्येकाची एकच भावना होती, कोबी आता आपल्यात नसला, तरी त्याला आणि त्याच्या शिकवणीला आम्ही कधीही विसरणार नाही. कारण इंग्रजीत म्हणतात ना, लेजंड्स नेव्हर डाय (महान लोकांना मरण नाही).

नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या (एनबीए) इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असणारा कोबी आपल्या गुण करण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जायचा. त्याने तब्बल २० वर्षे लॉस अँजेलिस लेकर्स या लोकप्रिय संघाचे प्रतिनिधित्व केले. १९९६ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी एनबीएमध्ये पदार्पण करणार्‍या कोबीला सुरुवातीच्या तीन मोसमांत लेकर्सला फारसे यश मिळवून देता आले नाही. परंतु, १९९९ मोसमाआधी लेकर्सने फील जॅक्सन यांची प्रशिक्षकपदी निवड केली आणि त्यांच्या मार्गदर्शनात लेकर्सने सलग तीन वर्षे एनबीएचे अजिंक्यपद पटकावले. या काळात कोबी आणि त्याचा संघातील सहकारी शकील ओनील हे एनबीएतील सर्वोत्तम दोन खेळाडू म्हणून ओळखले जाऊ लागले. काही मोसमांनंतर या दोघांचे पटत नसल्याने लेकर्स संघाने ओनीलला मायामी हिट संघात पाठवण्याच्या निर्णय घेतला. त्यामुळे लेकर्सच्या कामगिरीवर परिणाम झाला. कोबीने मात्र आपला चांगला खेळ सुरु ठेवत २००८ मध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर (मोसमातील सर्वोत्तम खेळाडू) हा मानाचा पुरस्कार मिळवला. काही वर्षांनी लेकर्सनी पॉ गसोलचा आपल्या संघात समावेश केला आणि त्याच्या साथीमुळे कोबीने आणखी दोनवेळा एनबीएचे जेतेपद पटकावले.

एनबीएत सर्वाधिक गुण करणार्‍या खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर (३३,६४३) असणारा कोबी ब्लॅक माम्बा या नावाने ओळखला जायचा. ब्लॅक माम्बा म्हणजे काय?, तर या नावाचा साप सर्वात विषारी सापांपैकी एक मानला जातो. २००३ साली प्रदर्शित झालेल्या किल बिल या हॉलिवूडच्या चित्रपटात मारेकर्‍याला ब्लॅक माम्बा या नावाने संबोधले जात होते. आपणही आशाचप्रकारे कोणाचीही आणि कसलीही पर्वा न करता खेळले पाहिजे, असे वाटल्याने कोबीने स्वतःला ब्लॅक माम्बा हे नाव दिले. तसेच माम्बाच्या पुढे मेन्टॅलिटी (मानसिकता) जोडत कोबीने माम्बा मेन्टॅलिटी असा शब्द तयार केला. एखाद्या चुरशीच्या सामन्यात जेव्हा दोन संघांत फारसा फरक नसेल, तेव्हा अखेरच्या क्षणांत आक्रमक खेळ करुन आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात कोबी पटाईत होता. बास्केटबॉल कोर्टवर माझा कोणीही मित्र नाही, असे कोबी म्हणायचा. त्याने २००३ मध्ये आपला आदर्श मायकल जॉर्डनविरुद्ध ५५ गुण करत माम्बा मेन्टॅलिटीचा प्रयत्य दिला.

माम्बा मेन्टॅलिटी ही केवळ खेळाडूंसाठीच नाही. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी निडरपणे आणि लक्ष केंद्रित करुन काम करणे आवश्यक आहे, असे कोबी आवर्जून सांगायचा. त्याने हे केवळ बोलून नाही, तर करुन दाखवले. कोबीने २०१६ मध्ये बास्केटबॉलमधून निवृत्ती घेतली. निवृत्त होण्याच्या पूर्वसंध्येला त्याने बास्केटबॉलवरील प्रेमाचे वर्णन करणारे पत्र लिहिले आणि या पत्रावरून डिअर बास्केटबॉल ही एक अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म तयार करण्यात आली. या चित्रपटाला २०१८ मध्ये ऑस्कर पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला. कोबीला त्याच्या दुसर्‍या इनिंगमध्येही भरघोस यश मिळत होते.

कोबीमधील जिद्द, कितीही मेहनत करण्याची तयारी, दृढ निश्चय या गुणांचे आजही उदाहरण दिले जाते. कोबीप्रमाणेच अ‍ॅलन आयव्हर्सन या महान खेळाडूने १९९६ मध्ये एनबीएत पदार्पण केले. याच मोसमात लेकर्स आणि आयव्हर्सनचा फिलाडेल्फिया सेव्हन्टी सिक्सर्स संघांमध्ये सामना होणार होता. त्या आधीच्या रात्री कोबी आयव्हर्सनला जेवायला घेऊन गेला. तेथून निघायच्या वेळी तू काय करणार आहेस?, असा प्रश्न कोबीने आयव्हर्सनला विचारला. याचे उत्तर देताना मी आता नाईट क्लबमध्ये जाणार आहे, तू काय करणार?, असे आयव्हर्सन म्हणाला. मी आता जिममध्ये जाऊन सराव करणार आहे, असे कोबीने प्रत्युत्तर दिले. कोबीची महान खेळाडू बनण्यासाठी कितीही मेहनत घेण्याची तयारी होती, हे यावरूनच लक्षात येते. आपल्या बास्केटबॉल कारकिर्दीत आणि आयुष्यात कोबीने जितके यश मिळवले, तितके क्वचितच कोणाला मिळाले असेल. त्यामुळे कोबीसारखा खेळाडू आणि माणूस पुन्हा होणे नाही, असे म्हणणे वावगे ठरु नये.