महापौर चषक कॅरम

शरीफ शेख, श्रृती सोनावणेला जेतेपद

Palghar

प्रगती कॅरम क्लबच्या शरीफ शेखने पुरुषांमध्ये तर प्रगती कॅरम क्लबच्याच श्रृती सोनावणेने महिलांमध्ये महापौर चषक अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे जेतेपद पटकावले. पुरुष प्रौढ गटात नवीन पाटीलने आणि सांघिक गटात समाज उन्नती मंडळ ‘ब’ संघाने बाजी मारली.

पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात प्रगती कॅरम क्लबच्या बिनसीडेड शरीफ शेखने अव्वल सीडेड प्रमोद शर्माला पराभूत केले. शरीफने पहिला गेम २५-६ असा जिंकला. दुसर्या गेमध्ये शरीफने पाचव्या बोर्डपर्यंत आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत २२-७ अशी आघाडी घेतली. यानंतरही त्याने आक्रमक खेळ सुरु ठेवत दुसरा गेम २५-१५ असा जिंकून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात दुसर्‍या सीडेड श्रृती सोनावणेने अंकीता हांडेचा २५-९, २५-१७ पराभव करत ही स्पर्धा जिंकली. पुरुष सांघिक गटाच्या अंतिम फेरीच्या सामन्यात समाज उन्नती मंडळ ‘ब’ संघाने समाज उन्नती मंडळ ‘अ’ संघावर २-१ असा निसटता विजय मिळवला. विजेत्या समाज उन्नती मंडळ ‘ब’ संघात स्वप्निल शर्मा, शरीफ शेख, विनोद परमार, परितोष बाबारिया, ईस्माईल शेख, अभिजित गमरे यांचा समावेश होता. या स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून परविंदर सिंग आणि तांत्रिक संचालक म्हणून आंतरराष्ट्रीय पंच जनार्धन संगम यांनी चांगले संचलन केले.