घरक्रीडाआगीतून फुफाट्यात!

आगीतून फुफाट्यात!

Subscribe

मागील मोसमाच्या अखेरीस एमसीएने निवड समिती सदस्यांचे राजीनामे मागितले. तसेच नव्या प्रशिक्षकांसाठी जाहिरात दिली. मात्र, हे सारं फोल ठरलं! पुन्हा येरे माझ्या मागल्या. निवड समितीत आजी-माजी खेळाडूंचा समावेश असतो. निवडीची सारी सूत्र त्यांच्याच हाती असतात. मात्र, यंदा एका पदाधिकार्‍याने संघ निवडीत हस्तक्षेप करण्याची आगळीक केली आणि त्याचे पडसाद उमटले. ४१ वेळच्या रणजी विजेत्या मुंबईवर सलग दुसर्‍यांदा बाद फेरी गाठण्यात अपयश आले.

लागोपाठ दुसर्‍या रणजी मोसमात साखळीतच गारद होण्याची आफत मुंबईवर ओढवली. ४१ वेळा रणजी करंडक पटकावणार्‍या मुंबई क्रिकेटची अवस्था बिकट होत चालली आहे. मागील वर्षी मोसमाच्या सुरुवातीला विजय हजारे करंडक पटकावण्याची किमया मुंबईने केली होती. यंदा मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) कार्यालयातील शेल्फ रिकामीच राहण्याची चिन्ह दिसत आहेत. अपवाद ज्युनियर क्रिकेट संघाचा. दिनेश लाड यांच्या मार्गदर्शनात १६ वर्षांखालील मुलांच्या संघाने विजय मर्चंट करंडकावर आपले नाव कोरले. आता प्रशिक्षक लाड यांनी राजीनामा दिला आहे.

मुंबईने बडोद्याला बडोद्यातच हरवून निर्णायक विजयाचे ६ गुण मिळवले. ही विजयी सलामी मात्र फसवी ठरली. घरच्या मैदानात (वानखेडे आणि बीकेसी) सलग दोन सामन्यांत मुंबईला पराभवांना सामोरे जावे लागले. हीच मुंबई क्रिकेटची शोकांतिका! ६०-७० च्या दशकात कसोटीपटूंवीना खेळणार्‍या मुंबईने जेतेपद आपल्याकडेच राखण्याचा पराक्रम कैक वेळा केला. मात्र, आता कसोटी क्रिकेट खेळणारे खेळाडू असूनही मुंबईला ३ दिवसातच पराभवाला सामोरं जावं लागत आहे.

- Advertisement -

१९८४-८५ ते १९९३-९४ या कालावधीत मुंबईला रणजी करंडक जिंकता आला नाही. गेली चार वर्षे मुंबईची पाटी कोरीच आहे. दरम्यानच्या काळात कर्नाटक, गुजरात, विदर्भ (दोनदा) यांनी रणजी करंडक पटकावला असून मुंबईला रणजी करंडकासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार अशीच चिन्हे दिसताहेत.

खडूस खेळाडूंचा मुंबईचा झरा आटत चालला आहे. फलंदाजी हे मुंबईचे नेहमीच बलस्थान राहिले असून यंदाच्या मोसमात चांगल्या, दर्जेदार फलंदाजांची वानवा जाणवली. अपवाद सर्फराज खानचा! उत्तर प्रदेशविरुद्ध त्रिशतक, हिमाचलविरुद्व द्विशतक आणि सौराष्ट्रविरुद्ध शतक अशी फलंदाजीची चढती कमान त्याने राखली. सलामीवीरांची समस्या ही मुंबईची मोठी डोकेदुखी!

- Advertisement -

शेवटच्या साखळी सामन्यात मध्य प्रदेशविरुद्ध आकर्षित गोमेलने रणजी पदार्पणातच शतक साजरे केले. दुसर्‍या डावात त्याचा साथीदार हार्दिक तामोरेने शतक झळकावले. हे दोन्ही युवा खेळाडू माहिमकर. फिशरमन कॉलनीतील शेजारी, तसेच जानी दोस्त. या दोन शतकवीरांमुळे मुंबईच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शम्स मुलानीने मधल्या फळीत सातत्याने धावा काढल्या. त्याची फलंदाजीतील कामगिरी कौतुकास्पद, पण त्याच्याकडून धावांप्रमाणे विकेटची अपेक्षा आहे. पहिल्याच सामन्यात त्याने १० मोहरे टिपून छाप पाडली खरी, पण नंतर त्याच्या गोलंदाजीतील जादू लुप्त झाली.

मुंबईच्या गोलंदाजांचे अपयशही डोळ्यात भारण्याजोगे! सौराष्ट्रच्या तळाच्या जोडीने ४० षटके टिच्चून फलंदाजी केल्याने मुंबईचा निर्णायक विजय हुकला आणि एकाच गुणावर समाधान मानण्याची वेळ त्यांच्यावर आली. अखेरच्या सामन्यात याची पुनरावृत्ती झाली. मध्य प्रदेशच्या आदित्य श्रीवास्तव आणि मिहीर हिरवानी या सातव्या जोडीने दुसर्‍या डावात जवळपास ३५ षटके खेळून काढली. त्यामुळे मुंबईला मोसमाचा शेवट गोड करण्यात अपयश आले.

मागील मोसमाच्या अखेरीस एमसीएने निवड समिती सदस्यांचे राजीनामे मागितले. तसेच नव्या प्रशिक्षकांसाठी जाहिरात दिली. मात्र, हे सारं फोल ठरलं! पुन्हा येरे माझ्या मागल्या. निवड समितीत आजी-माजी खेळाडूंचा समावेश असतो. निवडीची सारी सूत्र त्यांच्याच हाती असतात. मात्र, यंदा एका पदाधिकार्‍याने संघ निवडीत हस्तक्षेप करण्याची आगळीक केली आणि त्याचे पडसाद उमटले. पदाधिकर्‍यांची ही अजब तर्‍हा! खेळाडूंवर कोणाचा कसलाच वचक नाही. प्रमुख खेळाडू मुंबईत असूनही रणजी सामने खेळायचे टाळतात.

निवड समितीला अखेरच्या क्षणी संघात बदल करणे भाग पडले. गेल्या मोसमात मुंबईने दोन कर्णधार बदलले, तर यंदाही सूर्यकुमार यादव आणि त्यानंतर आदित्य तरे असे दोन कर्णधार निवडले. वारंवार कर्णधार बदलण्याची सवय घातकच. याबाबत एमसीएने खंबीर भूमिका घ्यायला हवी. मुंबईला ‘खमक्या’ प्रशिक्षकाची नितांत गरज असून एमसीएने हाथ आखडता न घेता चांगले मानधन देऊन नवा प्रशिक्षक नेमणे आवश्यक आहे. चालढकलपणा करून चालणार नाही. शिस्त केवळ खेळाडूंनाच नाही, तर पदाधिकार्‍यांनीही पाळायला हवी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -