Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर क्रीडा मेलबर्नमध्ये पुन्हा लॉकडाऊन; टी-२० वर्ल्डकपचा निर्णय लवकर होईल!

मेलबर्नमध्ये पुन्हा लॉकडाऊन; टी-२० वर्ल्डकपचा निर्णय लवकर होईल!

आयसीसी लवकरच या स्पर्धेबाबतचा अंतिम निर्णय घेईल अशी बीसीसीआयच्या अधिकाऱ्याला अपेक्षा आहे.

New Delhi

ऑस्ट्रेलियातील दुसरे सर्वात मोठे शहर असलेल्या मेलबर्नमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मेलबर्नमध्ये बुधवार मध्यरात्रीपासून पुन्हा सहा आठवड्यांसाठी लॉकडाऊन करण्यात येणार आहे. यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा लांबणीवर पडेल अशी चर्चा सुरु आहे. मेलबर्नमध्ये आता पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याने यंदा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात आयोजित करणे जवळपास अशक्यच झाले आहे. त्यामुळे आयसीसी लवकरच या स्पर्धेबाबतचा अंतिम निर्णय घेईल अशी बीसीसीआयच्या अधिकाऱ्याला अपेक्षा आहे.

ऑस्ट्रेलियात बरेच निर्बंध

यंदा ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक घेणे अशक्यच आहे. ऑस्ट्रेलियन सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बरेच प्रयत्न करत आहे. ते या आव्हानावर मात करण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. त्यांनी बरेच निर्बंध घातले आहेत. मेलबर्नमध्ये आता पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विश्वचषकाचे आयोजन करता येणार नाही. त्यामुळे आयसीसीने जबाबदारीने वागून टी-२० विश्वचषकाबाबतचा अंतिम निर्णय लवकर घेणे आवश्यक आहे आणि ते हे करतील अशी मला अपेक्षा आहे, असे बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.

एडिंग्स यांचे आयसीसीला पत्र

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष अर्ल एडिंग्स यांनी काही दिवसांपूर्वी आयसीसीला पत्र लिहिले होते. सध्याच्या परिस्थितीत ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक आयोजित करणे अवघड असल्याचे एडिंग्स यांनी पत्रात म्हटले होते. तसेच टी-२० विश्वचषकात १६ संघाचा सहभाग असल्याने ही स्पर्धा जैव-सुरक्षित वातावरणात घेणे शक्य नसल्याचेपाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष एहसान मणी म्हणाले होते. परंतु, असे असतानाही आयसीसीने अजूनही या स्पर्धेबाबतचा अंतिम निर्णय घेतलेला नाही.