घरक्रीडामॉर्गनचे विक्रमी शतक; इंग्लंड ३९७

मॉर्गनचे विक्रमी शतक; इंग्लंड ३९७

Subscribe

कर्णधार इयॉन मॉर्गनच्या विक्रमी शतकामुळे इंग्लंडने क्रिकेट विश्वचषकातील अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ५० षटकांत ६ विकेट गमावत ३९७ धावांचा डोंगर उभारला. मॉर्गनने अफलातून फलंदाजी करताना ७१ चेंडूत ४ चौकार आणि १७ षटकारांच्या मदतीने १४८ धावा चोपून काढल्या. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार लागवण्याचा विक्रम आपल्या नावे केला. तसेच ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या होती. अफगाणिस्तानच्या राशिद खानने या सामन्यात ९ षटकांत ११० धावा खर्ची केल्या, ज्या विश्वचषकातील सामन्याच्या एका डावात एखाद्या गोलंदाजाने दिलेल्या सर्वाधिक धावा आहेत.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जेसन रॉय दुखापतीमुळे या सामन्यात खेळू न शकल्याने जॉनी बेअरस्टोसोबत जेम्स विन्सने इंग्लंडच्या डावाची सुरुवात केली. त्यांनी सावध फलंदाजी करत ४४ धावांची भागीदारी केल्यानंतर विन्सला २६ धावांवर दवलत झादरानने बाद केले. यानंतर बेअरस्टो आणि जो रूट यांनी अप्रतिम फलंदाजी केली. बेअरस्टोने ६१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने पुढेही चांगली फलंदाजी सुरू ठेवत रूटसोबत दुसर्‍या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली. बेअरस्टोचे शतक मात्र हुकले. त्याला ९० धावांवर गुलबदीन नैबने माघारी पाठवले.

- Advertisement -

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मॉर्गनने सुरुवातीपासून फटकेबाजी करत ३६ चेंडूत आपले अर्धशतक, तर अर्धशतकानंतर अधिकच आक्रमण खेळत ५७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याचे हे विश्वचषकातील चौथे सर्वात जलद शतक होते. रूटला मात्र या स्पर्धेतील तिसरे शतक करण्यात अपयश आले. तो ८८ धावांवर बाद झाला. त्याने आणि मॉर्गनने १८९ धावांची भागीदारी केली. दोन चेंडूनंतर नैबनेच मॉर्गनला १४८ धावांवर माघारी पाठवले. अखेर मोईन अलीने अवघ्या ९ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांसह ३१ धावा केल्याने इंग्लंडने ५० षटकांत ६ बाद ३९७ इतकी धावसंख्या उभारली.

संक्षिप्त धावफलक

- Advertisement -

इंग्लंड : ५० षटकांत ६ बाद ३९७ (इयॉन मॉर्गन १४८, जॉनी बेअरस्टो ९०, जो रूट ८८, मोईन अली ३१; गुलबदीन नैब ३/६८, दवलत झादरान ३/८५) वि. अफगाणिस्तान.

इंग्लंडचाही पराक्रम

इंग्लंडच्या फलंदाजांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. इंग्लंडने या सामन्यात २५ षटकार लगावले. त्यांच्याकडून इयॉन मॉर्गनने १७, मोईन अलीने ४, जॉनी बेअरस्टोने ३ आणि जो रूटने १ षटकार मारला. त्यामुळे इंग्लंड संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार लागवण्याचा विक्रम केला. याआधीही हा विक्रम इंग्लंडच्या नावे होता. त्यांनी यावर्षीच वेस्ट इंडिजविरुद्ध २४ षटकार मारले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -