IPL 2020 : पंचांना निर्णय बदलण्यास भाग पाडल्याने धोनीवर टीका!

धोनीचे कौतुक करणारे काही चाहते आता त्याच्यावर आता टीका करताना दिसत आहेत.

महेंद्रसिंग धोनी

भारताचा माजी कर्णधार, तसेच आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा भारताच्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो. इतकेच नाही, तर धोनी हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्याचे अनेक चाहते आहेत. मात्र, नेहमी धोनीचे कौतुक करणारे काही चाहते याच धोनीवर आता टीका करताना दिसत आहेत. सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या आयपीएल सामन्यात पंचांवर दबाव टाकत त्यांना निर्णय बदलण्यास भाग पाडल्याची धोनीवर टीका होत आहे.

चेन्नई-हैदराबाद सामन्यातील घटना

चेन्नई आणि हैदराबाद यांच्यातील सामना मंगळवारी पार पडला. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १६७ धावा केल्या. याचा पाठलाग करताना हैदराबादला १४७ धावाच करता आल्याने त्यांनी हा सामना २० धावांनी गमावला. हैदराबादच्या डावातील १९ वे षटक चेन्नईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने टाकले. या षटकात शार्दूलने एक चेंडू फलंदाजी करणाऱ्या राशिद खानपासून दूर टाकला. तो चेंडू बराच बाहेर गेला असल्याचे वाटल्यामुळे ऑस्ट्रेलियन पंच पॉल रायफल चेंडू व्हाईड ठरवणार होते. मात्र, ते व्हाईडची खूण करणार इतक्याच यष्टींमागून धोनीने नाराजी दर्शवली. त्यामुळे पंच रायफल यांनी त्यांचा चेंडू व्हाईड ठरवण्याचा निर्णय बदलला.

धोनीला शिक्षा का होत नाही?  

पंच पॉल रायफल यांना निर्णय बदलण्यास भाग पडल्याने धोनीवर सोशल मीडियावरून बरीच टीका झाली. ‘धोनी नेहमीच पंचांवर दबाव टाकतो आणि त्यांना निर्णय बदलण्यास भाग पाडतो. त्याने असे कितीतरी वेळा केले आहे. हवे तेव्हा मैदानात येऊन तो पंचांवर भडकतो. त्यांच्या निर्णयावर नाराजी दर्शवतो. मात्र, त्यानंतरही त्याला शिक्षा का होत नाही,’ असे एका व्यक्तीने ट्विटरवर लिहिले. आयपीएलच्या मागील मोसमात धोनी पंचांच्या निर्णयावर नाराजी दर्शवण्यासाठी थेट मैदानात आला होता. त्यानंतर त्याला दंडही ठोठावण्यात आला होता.