घरक्रीडाधोनीला वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकायचा होता - होल्डिंग

धोनीला वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकायचा होता – होल्डिंग

Subscribe

मी धोनीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघितले आणि मला कळले की त्याला तो सामना जिंकायचा होता. त्यामुळे भारतीय संघ हा सामना जिंकण्यासाठी खेळत नव्हता असे मला वाटत नाही, असे होल्डिंग यांनी सांगितले.

वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज मायकल होल्डिंग यांनी भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनीची पाठराखण केली आहे. धोनीला २०१९ विश्वचषकात इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकायचा होता, असे ते म्हणाले. मागील वर्षीच्या विश्वचषकातील भारत विरुद्ध यजमान इंग्लंड या साखळी सामन्याची सध्या बरीच चर्चा होत आहे. भारताने हा सामना ३१ धावांनी गमावला होता. या सामन्यात भारताचा संघ खरंच जिंकण्याच्या उद्देशाने खेळला का?, अशी शंका इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने ‘ऑन फायर’ या त्याच्या पुस्तकात उपस्थित केली. तसेच धोनी या सामन्यात ज्या पद्धतीने खेळला, त्याबाबतही स्टोक्सने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. धोनीने ३१ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या होत्या. परंतु, त्याने आधीपासूनच आक्रमक फलंदाजी केली असती, तर भारतीय संघ कदाचित जिंकला असता असे त्याला वाटते. परंतु, होल्डिंग हे स्टोक्सशी सहमत नाहीत.

लोक आजकाल त्यांच्या पुस्तकांमध्ये काहीही लिहितात. कारण, आता स्वतःचे मत मांडणे अधिक सोपे झाले असून त्यांना मोकळीकही आहे. लोकांना आपल्या पुस्तकात काहीतरी खरमरीत लिहावे लागते. परंतु, जे लोक तो सामना पाहत होते, त्यापैकी बरेच जण भारतीय संघ जिंकण्यासाठी खेळत नव्हता, या स्टोक्सशी मताशी सहमत होणार नाहीत. भारताला तो सामना जिंकणे अनिवार्य नव्हते. मात्र, ते मुद्दाम सामना गमावण्यासाठी खेळले असे म्हणणे चुकीचे ठरेल. मी तो सामना पाहत होतो आणि भारतीय संघ १०० टक्के देऊन खेळत होता असे मला वाटले नाही. परंतु, मी धोनीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघितले आणि मला कळले की त्याला तो सामना जिंकायचा होता. त्यामुळे भारतीय संघ हा सामना जिंकण्यासाठी खेळत नव्हता असे मला वाटत नाही. मात्र, त्यांच्यासाठी हा ‘करो या मरो’चा सामना असता, तर ते नक्कीच अधिक जिद्दीने खेळले असते, असे होल्डिंग यांनी सांगितले.

- Advertisement -

धोनीलाच निर्णय घेऊ द्या – मोरे

धोनी २०१९ विश्वचषकानंतर क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे त्याच्या भविष्याबाबत बरीच चर्चा होत आहे. परंतु, पुढे खेळत राहायचे की निवृत्त व्हायचे याचा निर्णय धोनीलाच घेऊ दिला पाहिजे असे भारताचे माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांना वाटते. धोनीला पुनरागमन करणे सोपे जाणार नाही. तुमचे मन खेळायला सांगते, पण शरीर त्यासाठी परवानगी देत नाही. आयपीएल सुरु होण्याआधी मी धोनीला नेट्समध्ये पाहिले होते. तो अजूनही फिट असून या स्पर्धेत दमदार कामगिरी करण्यास उत्सुक होता. टेनिसमध्ये ३८-३९ व्या वर्षीही खेळाडू आपला सर्वोत्तम खेळ करतात. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असाल, तर तुम्ही पुनरागमन करु शकता. आशिष नेहराने पुनरागमन केले होते आणि चांगली कामगिरी केली होती, असे मोरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -