मुंबई बंदर, पोलीस, देना बँक बाद फेरीत

Mumbai
महापौर चषक कबड्डी स्पर्धा

महिंद्रा, न्यू इंडिया इन्शुरन्स, मुंबई बंदर, एअर इंडिया, देना बँक, युनियन बँक, मध्य रेल्वे, जे.जे. हॉस्पिटल, मुंबई पोलीस, बी. ई. जी. या संघांनी ‘मुंबई महापौर चषक’ कबड्डी स्पर्धेच्या व्यावसायिक पुरुषांच्या बाद फेरीत प्रवेश केला. महिलांमध्ये महात्मा गांधी स्पोर्ट्स, सुवर्णयुग स्पोर्ट्स , शिवशक्ती महिला,स्वराज्य, राजमाता जिजाऊ,शिवतेज मंडळ,जय हनुमान मंडळ, डॉ. शिरोडकर यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

पुरुषांमध्ये मुंबई बंदरने एअर इंडियाला २७-२२ असे नमवत ‘ब’ गटात अव्वल क्रमांक पटकावला. स्मिथिल पाटील, किरण मगर, आशिष मोहिते या विजयाचे शिल्पकार ठरले. मुंबई पोलीस संघाने ‘ई’ गटात ठाणे पोलीस संघाचा २०-०९ असा पराभव केला. मध्यांतराला १३-०७ अशी आघाडी घेणार्‍या मुंबईने नंतरही चांगला खेळ करत हा विजय साकारला. दुसर्‍या सामन्यात मुंबई पोलिसांनी पुण्याच्या बी. ई. जी. ला ३८-३७ असे नमवत या गटात पहिला क्रमांक पटकावला. ‘अ’ गटात महिंद्राने न्यू इंडिया इन्शुरन्सला ३७-१४ असे पराभूत करीत गटजेतेपद मिळविले. महिंद्राच्या अनंत पाटील, सुहास वाघेरे,अक्षय बेर्डे, शेखर तटकरे यांनी चमकदार खेळ केला. ‘ड’ गटात मध्य रेल्वेने रिझर्व्ह बँकेवर ३५-१९ अशी मात केली. रोहित पार्टे, सुनील शिवतरकर, सूरज बनसोडे, गणेश बोडके यांनी आक्रमक खेळ करत मध्य रेल्वेला पहिल्या डावात १९-०९ अशी आघाडी मिळवून देत विजयाचा पाया रचला. याच गटात जे. जे. हॉस्पिटलने रिझर्व्ह बँकेवर ३५-३३ असा विजय मिळवला. दोन पराभवांमुळे बँकेवर साखळीतच गारद होण्याची वेळ आली.

महिलांच्या ‘अ’ गटात महात्मा गांधी स्पोर्ट्सने अमर हिंदला ३६-१५ असे पराभूत केले. मध्यांतराला १८-०९ अशी आघाडी घेणार्‍या महात्मा गांधीने उत्तरार्धातदेखील अप्रतिम खेळ करीत हा विजय मिळवला. सायली जाधव, मीनल जाधव, तेजस्वी पाटेकर महात्मा गांधीच्या या विजयात चमकल्या. अमर हिंदच्या श्रद्धा कदमने एकाकी झुंज दिली. ‘ब’ गटात शिवशक्तीने स्वराज्यला ५४-१४ असे पराभूत केले. मध्यांतराला २८-०५ अशी आघाडी घेणार्‍या शिवशक्तीला उत्तरार्धातदेखील स्वराज्यने फारसा प्रतिकार केला नाही. शिवशक्तीच्या सोनाली शिंगटे, पूजा यादव, रेखा सावंत, रक्षा नारकर यांनी दमदार खेळ केला. ‘ड’ गटात जय हनुमानने संघर्ष स्पोर्ट्सला ३९-१९ असे नमवत या गटाचे जेतेपद मिळविले. पूजा पाटील, मृणाल टोपणे, आसावरी खोचरे यांचा खेळ जय हनुमानच्या या विजयात महत्त्वाचा ठरला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here