घरक्रीडाजैस्वालचा द्विशतकी झंझावात

जैस्वालचा द्विशतकी झंझावात

Subscribe

मुंबईची झारखंडवर मात

युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने केलेल्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर मुंबईने विजय हजारे करंडकाच्या सामन्यात झारखंडवर ३९ धावांनी मात केली. १७ वर्षीय जैस्वालने या सामन्यात १५४ चेंडूत २०३ धावांची खेळी केली. या त्याच्या द्विशतकात १७ चौकार आणि १२ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. स्थानिक एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा जैस्वाल हा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. याआधी या स्पर्धेत त्याने केरळाविरुद्ध ११३ आणि गोव्याविरुद्ध १२२ धावांची खेळी केली होती.

झारखंडविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर जैस्वाल आणि आदित्य तरे यांनी मुंबईच्या डावाची अप्रतिम सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ३४.३ षटकांत २०० धावांची भागीदारी केली. तरे १०१ चेंडूत ७८ धावांचे योगदान दिले. त्याला अनुकूल रॉयने यष्टीरक्षक ईशान किशनकरवी झेलबाद केले. जैस्वालने मात्र एक बाजू लावून धरत या स्पर्धेतील आपले तिसरे शतक पूर्ण केले.

- Advertisement -

त्याने दुसर्‍या विकेटसाठी सिद्धेश लाडसोबत १०५ धावा जोडल्या, ज्यात लाडचा वाटा ३२ धावांचा होता. यानंतर जैस्वालने आपले द्विशतकही झळकावले. स्थानिक क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजाने द्विशतक करण्याची ही नववी वेळ आहे. मात्र, त्याला २०३ धावांवर विवेकानंद तिवारीने माघारी पाठवले. पुढे श्रेयस अय्यरने १४ चेंडूत ३१ धावा केल्या. त्यामुळे मुंबईने ५० षटकांत ३ बाद ३५८ अशी धावसंख्या उभारली.

याचा पाठलाग करताना झारखंडने चांगली झुंज दिली. पहिल्या तीन विकेट्स त्यांनी ६६ धावांत गमावल्या. मात्र, मधल्या फळीतील सौरभ तिवारी आणि विराट सिंहने चौथ्या विकेटसाठी १७१ धावांची भागी करत झारखंडच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. सौरभला ७७ धावांवर लाडने माघारी पाठवले. परंतु, विराटने चांगली फलंदाजी सुरु ठेवत ७७ चेंडूत १०० धावा केल्या. मात्र, यानंतर अनुकूल रॉय (४६ धावा) इतरांना चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे झारखंडचा डाव ३१९ धावांत आटोपला. मुंबईकडून धवल कुलकर्णीने ३७ धावांत ५ बळी घेतले.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक – मुंबई : ५० षटकांत ३ बाद ३५८ (जैस्वाल २०३, तरे ७८; विवेकानंद तिवारी २/३२) विजयी वि. झारखंड : ४६.४ षटकांत सर्वबाद ३१९ (विराट १००, सौरभ तिवारी ७७; धवल ५/३७).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -