घरक्रीडाअमर संदेश, अग्निशमन मित्र मंडळाचा चौथ्या फेरीत प्रवेश

अमर संदेश, अग्निशमन मित्र मंडळाचा चौथ्या फेरीत प्रवेश

Subscribe

मुंबई शहर निवड चाचणी कबड्डी

अमर संदेश, विद्यासागर, अग्निशमन मित्र मंडळ, आदर्श मंडळ, श्री साई क्रीडा मंडळ या संघांनी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पुरुष द्वितीय श्रेणी गटात चौथी फेरी गाठली. अग्निशमन मित्र मंडळाने एकविरा क्रीडा मित्र मंडळाचा ४८-३६ असा पराभव केला. या सामन्याच्या मध्यंतराला १७-१९ अशा पिछाडीवर पडलेल्या अग्निशमनच्या सुयश कदमने उत्तरार्धात एकाच चढाईत बोनससह ५ गडी टिपत एकूण ६ गुणांची कमाई केली. त्याला पकडीत निलेश वीरने चांगली साथ दिली.

नायगावच्या भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर सुरू असलेल्या या गटातील तिसर्‍या फेरीच्या सामन्यात अमर संदेश स्पोर्ट्सने मध्यंतरातील १६-२४ अशी पिछाडी भरून काढत न्यू बर्डस स्पोर्ट्सचे आव्हान ३७-३५ असे संपुष्टात आणले. अमरच्या या विजयात श्रेयश व कल्पेश या पाटील बंधूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. डेव्हिड राजन, टिटस अभिषेक यांनी न्यू बर्डसकडून चांगला खेळ केला.

- Advertisement -

विद्यासागर क्रीडा मंडळाने जय मल्हार स्पोर्ट्सला ३८-३६ (७-५) असे पराभूत केले. नियमित सामन्याअखेरीस दोन्ही संघांमध्ये ३१-३१ अशी बरोबरी होती. मात्र, ५-५ चढायांच्या डावात विद्यासागर क्रीडा मंडळाने ७-५ अशी बाजी मारत या स्पर्धेत आगेकूच केली. त्यांच्याकडून सागर उत्तरकर, प्रथमेश कामाणे यांनी दमदार खेळ केला. संदेश घडशी, निखिल काळे यांनी जय मल्हारकडून चांगला खेळ केला, पण त्यांना आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. तसेच आदर्श क्रीडा मंडळाने स्नेहसागर स्पोर्ट्सचा ५८-२२ असा धुव्वा उडवला. त्यांच्या सुरज देसाईने एकाच चढाईत ४ गडी टिपले. त्याला चढाईत फिरोज जामदार, तर पकडीत राजेश पाटीलने उत्तम साथ दिली.

श्री साई क्रीडा मंडळाने महालक्ष्मी मंडळाला ३०-२९ असे नमवत आगेकूच केली. स्वप्नील पवार, सुबोध पाडावे यांनी उत्कृष्ट खेळ करत साई क्रीडा मंडळाला १६-९ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, उत्तरार्धात त्यांना कडवा प्रतिकार झाला. महालक्ष्मीच्या अनिल पाटील, दीपक शिंदे यांनी आपल्या खेळाची गती वाढवत सामन्यात रंगत आणली. मात्र, त्यांचा पराभव झाला. नवोदित संघाने मातृभूमीला ३०-२९ असे पराभूत केले. निखिल पवार, दीपेश धुरत यांच्या चतुरस्त्र खेळामुळे अष्टविनायक क्रीडा मंडळाने प्रॉमिस स्पोर्टसला ३०-२८ असे नमवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -