IPL 2020 : मुंबईची विजयाची हॅटट्रिक; राजस्थानविरुद्ध विजयी

मुंबईने सामना ५७ धावांनी जिंकला.

Mumbai Indians

सूर्यकुमार यादवच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा ५७ धावांनी पराभव केला. हा मुंबईचा यंदाच्या मोसमातील एकूण चौथा आणि सलग तिसरा विजय ठरला. त्यामुळे गतविजेता मुंबई इंडियन्स संघ सहा सामन्यांत आठ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. मुंबईला यंदा राजस्थानसह कोलकाता, पंजाब आणि हैदराबाद यांच्याविरुद्ध विजय मिळवण्यात यश आले आहे.

सूर्यकुमारचे यंदा पहिले अर्धशतक

आज झालेल्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मुंबईच्या डावाची चांगली सुरुवात झाली. सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि रोहित यांनी ४.५ चेंडूत ४९ धावांची भागीदारी रचल्यावर डी कॉकला (२३) कार्तिक त्यागीने बाद केले. यानंतर श्रेयस गोपाळने रोहित (३५) आणि ईशान किशन (०) यांना सलग दोन चेंडूंवर बाद करत मुंबईला अडचणीत टाकले. तर कृणाल पांड्याही केवळ १२ धावा करुन माघारी परतला. एका बाजूला विकेट जात असताना दुसऱ्या बाजूने सूर्यकुमार यादवने अप्रतिम फलंदाजी करत यंदाच्या मोसमातील आपले पहिले अर्धशतक झळकावले. त्याने ४७ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ७९ धावांची खेळी केली. त्याला हार्दिक पांड्याने (नाबाद ३०) चांगली साथ दिल्याने मुंबईने २० षटकांत ४ बाद १९३ अशी धावसंख्या उभारली.

बुमराहच्या ४ विकेट

याचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाची खराब सुरुवात झाली. ट्रेंट बोल्टने यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांना खातेही न उघडता माघारी पाठवले. तर कर्णधार स्टिव्ह स्मिथला (६) जसप्रीत बुमराहने बाद केले. सलामीवीर जॉस बटलरने एक बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला. त्याने ४४ चेंडूत ७० धावांची खेळी केली. मात्र, जेम्स पॅटिन्सनच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याच्या नादात तो बाद झाला. पोलार्डने त्याचा उत्कृष्ट झेल पकडला. यानंतर जोफ्रा आर्चर (२४) वगळता इतर फलंदाजांना फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. त्यामुळे राजस्थानचा डाव १३६ धावांवर आटोपला आणि मुंबईने सामना ५७ धावांनी जिंकला. मुंबईकडून बुमराहने ४ विकेट घेतल्या.