LPL : भारताचा ‘हा’ क्रिकेटपटू दिसणार लंका प्रीमियर लीगमध्ये

लंका प्रीमियर लीगला २६ नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. 

मुनाफ पटेल

जगभरातील विविध टी-२० लीग्समध्ये खेळण्यासाठी भारतीय खेळाडूंना बीसीसीआय परवानगी देत नाही. मात्र, निवृत्त झालेल्या भारतीय खेळाडूंना परदेशातील टी-२० स्पर्धांमध्ये खेळण्यापासून बीसीसीआय रोखू शकत नाही. याचाच फायदा आता भारताचा माजी वेगवान गोलंदाज मुनाफ पटेलला होणार आहे. मुनाफ यंदा श्रीलंकेतील स्थानिक टी-२० स्पर्धा ‘लंका प्रीमियर लीग’मध्ये खेळताना दिसणार आहे. त्याला कँडी टस्कर्स संघाने करारबद्ध केले आहे. कँडी संघात मुनाफसह भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाणचाही समावेश आहे. ‘भारताचा माजी वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल यंदा कँडी संघाकडून खेळणार असल्याचे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे,’ टस्कर्स फ्रेंचायझीने ट्विट केले.

वेगवान गोलंदाज मुनाफ पटेलने २०१८ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २०११ मध्ये खेळला होता. मात्र, त्यानंतरही तो स्थानिक क्रिकेट, तसेच आयपीएल स्पर्धेत खेळत होता. मुनाफने भारताकडून १३ कसोटीत ३५ विकेट, ७० एकदिवसीय सामन्यांत ८६ विकेट आणि ३ टी-२० सामन्यांत ४ विकेट घेतल्या होत्या. तसेच आयपीएल स्पर्धेत त्याने राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्स या संघांचे प्रतिनिधित्व केले होते. आयपीएलमध्ये ६३ सामन्यांत ७४ विकेट त्याच्या नावे आहेत. आता तो लंका प्रीमियर लीगमध्ये खेळणार असून या स्पर्धेला २६ नोव्हेंबरपासून सुरुवात होईल.