घरक्रीडामुश्ताक अली करंडक स्पर्धा

मुश्ताक अली करंडक स्पर्धा

Subscribe

सिद्धेश लाडने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडकाच्या सुपर लीगमधील सामन्यात उत्तर प्रदेशचा ४६ धावांनी पराभव केला. हा मुंबईचा सुपर लीगमधील सलग तिसरा विजय होता. मात्र, हा विजय मुंबईला या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पुरेसा नव्हता.

मुंबईविरुद्धच्या सामन्यात उत्तर प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मुंबईचा सलामीवीर जस बिस्त खातेही न उघडता माघारी परतला. यानंतर एकनाथ केरकर आणि सिद्धेश लाड यांनी चांगली फलंदाजी करत १२ षटकांत ९६ धावांची भागीदारी केली. केरकर ४६ धावांवर धावचीत झाला. त्याने या धावा ३६ चेंडूंत ३ चौकार आणि १ षटकारासह केल्या. लाडने मात्र चांगली फलंदाजी सुरू ठेवत आपले अर्धशतक पूर्ण केले, पण ४४ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ६२ धावा केल्यानंतर लाडला मोहसीन खानने बाद केले. पुढे कर्णधार श्रेयस अय्यरने ४३ धावांची आक्रमक खेळी केली. त्यामुळे मुंबईने आपल्या २० षटकांत ७ विकेट गमावत १८३ धावा केल्या.

- Advertisement -

मुंबईने दिलेल्या १८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना उत्तर प्रदेशने २४ धावांतच ४ विकेट गमावल्या. यानंतर प्रियम गर्ग (२३) आणि सौरभ कुमार (२४) यांनी उत्तर प्रदेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोघांव्यतिरिक्त इतर फलंदाजांना २० धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे उत्तर प्रदेशचा संपूर्ण संघ १३७ धावांत गारद झाला. मुंबईकडून शार्दूल ठाकूर, शिवम दुबे आणि सिद्धेश लाड यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांनी सुपर लीगमधील चार पैकी चार सामने जिंकत या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मंगळवारी महाराष्ट्राने निखिल नाईकच्या नाबाद ९५ धावांमुळे रेल्वेचा २१ धावांनी पराभव केला. निखिलने महाराष्ट्राच्या डावातील अखेरच्या षटकात ५ उत्तुंग षटकार लगावले. त्याने आपल्या खेळीत एकूण ४ चौकार आणि ८ षटकार लगावले. ही त्याची टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी होती. कर्नाटकने आपल्या अखेरच्या सामन्यात विदर्भाचा पराभव केला. हा कर्नाटकचा टी-२० मधील सलग १३ वा विजय होता. हा स्थानिक क्रिकेटमधील विक्रम आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -