आमच्यासाठी प्रार्थना करा!

पाकिस्तानला रवाना होण्याआधी मुस्ताफिझूरचे ट्विट

Mumbai

पाकिस्तानला रवाना होण्याआधी बांगलादेशचा प्रमुख गोलंदाज मुस्ताफिझूर रहमानने एक ट्विट केले. त्याने ट्विटरवर आपल्या बांगलादेश संघातील सहकार्‍यांसोबत फोटो शेअर केला आणि ’आमच्यासाठी प्रार्थना करा’, असे त्या फोटोखाली लिहिले. त्याच्या या ट्विटबाबत बरीच चर्चा होत आहे.

श्रीलंकेने मागील वर्षीच्या अखेरीस पाकिस्तानचा दौरा केला आणि यात पाकिस्तानने तब्बल १० वर्षांनंतर प्रथमच मायदेशात कसोटी सामना खेळला. हा दौरा यशस्वीरित्या पार पडला, पण पाकिस्तानमधील सुरक्षेचा प्रश्न अजूनही कायम आहे. त्यामुळे बांगलादेशची सुरुवातीला पाकिस्तान दौर्‍यावर जाण्याची तयारी नव्हती. मात्र, दोन्ही देशांच्या अधिकार्‍यांमध्ये दुबईत चर्चा झाली आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपला संघ पाकिस्तानात पाठवण्यास होकार दिला.

जानेवारी ते एप्रिल या कालावधीत बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये तीन टी-२०, दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार असून टी-२० मालिकेला २४ जानेवारीपासून सुरुवात होईल. तसेच या दोन देशांत ३ एप्रिलला एक एकदिवसीय सामनाही होईल. बांगलादेशचा अनुभवी खेळाडू मुशफिकूर रहीमने वैयक्तिक कारणांमुळे पाकिस्तानला न जाण्याचा निर्णय घेतला.