घरक्रीडाचौथ्या दिवशी पहिले सत्र खेळून काढणे गरजेचे!

चौथ्या दिवशी पहिले सत्र खेळून काढणे गरजेचे!

Subscribe

न्यूझीलंडचे गोलंदाज योग्य टप्प्यावर गोलंदाजी करुन आम्हाला अडचणीत टाकत आहेत. मात्र, आमच्या फलंदाजांनी चौथ्या दिवशी पहिले सत्र खेळून काढणे गरजेचे आहे, असे मत भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने व्यक्त केले. भारताची तिसर्‍या दिवसअखेर दुसर्‍या डावात ४ बाद १४४ अशी अवस्था होती आणि ते अजून ३९ धावांनी पिछाडीवर होते. मात्र, अजिंक्य रहाणे (६७ चेंडूत नाबाद २५ ) आणि हनुमा विहारी (७० चेंडूत नाबाद १५) या पाचव्या जोडीने सावध फलंदाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना झुंज दिली.

न्यूझीलंडचे गोलंदाज योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत आहेत. सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळपट्टीकडून त्यांना खूप मदत मिळत होती. दुसर्‍या डावात मात्र तितकीशी मदत मिळत नसतानाही ते आम्हाला अडचणीत टाकत आहेत. त्यामुळे आता आमची खर्‍या अर्थाने कसोटी आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी या डावात आतापर्यंत ६५ षटके टाकली आहेत आणि ते चौथ्या दिवशी कशी गोलंदाजी करतात हे पाहावे लागेल. मात्र, आमच्या फलंदाजांनी पहिले सत्र खेळून काढणे गरजेचे आहे, असे अश्विन म्हणाला.

- Advertisement -

न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी अप्रतिम खेळ करत १०० हूनही अधिक धावांची भर घातली. याविषयी अश्विनने सांगितले, आम्ही प्रतिस्पर्धी संघाचा डाव लवकर गुंडाळणे गरजेचे आहे. मात्र, जेमिसन, एजाज आणि बोल्टला श्रेय दिले पाहिजे. त्यांनी परिस्थितीनुसार फलंदाजी केली. आता तळाच्या फलंदाजांना बाद करणे सोपे राहिले नाही. ते स्वतःहून विकेट फेकत नाहीत.

कोहलीविरुद्ध बाऊंसर टाकण्याची योजना -बोल्ट
भारताचा कर्णधार विराट कोहलीला (४३ चेंडूत १९) दुसर्‍या डावात ट्रेंट बोल्टने उसळी घेतलेला चेंडू टाकत माघारी पाठवले. त्याच्याविरुद्ध उसळी घेणारे चेंडू टाकण्याची आमची योजना होती, असे बोल्टने सांगितले. विराटला चेंडू सोडायला आवडत नाही. भारताच्या इतर काही फलंदाजांप्रमाणे विराटही जास्तीतजास्त चेंडू बॅटने मारायचा प्रयत्न करतो. आम्ही खराब चेंडू टाकल्यास तो फटका मारतो आणि चेंडू सीमारेषेबाहेर पोहोचवतो. त्यामुळे त्याच्याविरुद्ध उसळी घेणारे चेंडू टाकण्याची आणि त्याला वेगाने धावा करण्यापासून रोखण्याची आमची योजना होती. आमच्या या योजनेला यश आले, असे बोल्ट म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -