एकदिवसीय सामन्यांसाठी नेपाळची क्रिकेट टीम सज्ज

Nepal team
नेपाळची क्रिकेट टीम सज्ज

नेदर्लंड्स सोबत खेळणार पहिला एकदिवसीय सामना

नेपाळची क्रिकेट टीम एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणार आहे. नेदरलँड सोबत नेपाळचे दोन एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. यावर्षी आयपीएल हंगामात नेपाळचा १८ वर्षीय फिरकी गोलंदाज संदीप लमिचाने दिल्ली डेरडेव्हिल्स संघाकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली होती. यानंतर आता नेपाळचा क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण करत आहे. त्यामुळे २०१८ हे वर्ष नेपाळच्या क्रिकेट प्रेमींसाठी फार महत्वाचे वर्ष आहे.

सुमारे साडेचार वर्षानंतर नेपाळचा क्रिकेट संघ एकदिवसीय सामना खेळणार आहे. यापूर्वी त्यांनी शेवटचा एकदिवसीय सामना वर्ल्डकपच्या पात्रता फेरीत कॅनडासोबत खेळला होता. १ आणि ४ ऑगस्ट रोजी होणारे एकदिवसीय सामने खेळण्यासाठी नेपाळचा क्रिकेट संघ नेदरलँडला जाणार आहे. विशेष म्हणजे नेदरलँडमध्ये पाच वर्षानंतर एकदिवसीय सामना होणार आहे. यापूर्वी २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ नेदरलँड मध्ये एकदिवसीय सामना खेळायला आला होता.

क्रिकबझ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार नेदरलँडचे कोच रायन कॅम्पबेल यांनी सांगितले की, “आम्ही नेपाळला त्यांच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी आमंत्रित करत आहोत. २०१३ पासून घरगुती मैदानावरचा हा आमचा पहिला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत. यापूर्वी लॉर्ड्सवर खेळण्याचे निमंत्रित मिळाले होते. या सन्मानानंतर आम्ही आमच्या देशातील क्रिकेट चाहत्यांना खेळाचा आनंद देण्यासाठी उत्सुक आहोत.”

नेपाळचा हिरो संदीप लमिचानेकडे सर्वांचे लक्ष्य

नेपाळ आणि नेदरलँड मध्ये होणाऱ्या या सामन्यात सर्वांचे लक्ष १८ वर्षीय संदिपवर असणार आहे. संदीप हा एकमेव नेपाळचा क्रिकेटर आहे ज्याला आयपीएलमध्ये विकत घेतले. फिरकी गोलंदाज संदीपने दिल्लीकडून खेळत असताना तीन सामन्यात पाच विकेट घेऊन क्रिकेसरसिकांची मने जिंकली. खासकरून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिल्लीचा कोच रिकी पॉन्टिंग याच्याकडून मिळालेल्या प्रशंसेने संदीपला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.

SANDEEP
संदीप लमिचाने

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here