नेपाळच्या खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचे सामनाधिकारी

Mumbai
गंधाली पालांडे आणि प्रशांत पाटणकर

नेपाळ खो-खो फेडरेशनने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी भारतीय खो-खो महासंघाकडे सामनाधिकारी पाठविण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देत भारतीय खो-खो महासंघाने या स्पर्धेकरीता महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या प्रशांत पाटणकर आणि गंधाली पालांडे यांची सामनाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ही स्पर्धा १९ ते २३ एप्रिल या कालावधीत होणार आहे.

मुंबई उपनगर खो-खो संघटनेचे कार्यवाह, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रशांत पाटणकर हे खो-खो क्षेत्रात गेली ३३ वर्षे कार्यरत आहे. सध्या ते भारतीय खो-खो महासंघाच्या पंचमंडळाचे सचिव आहेत. खो-खो पंच म्हणून त्यांच्याकडे २७ वर्षांचा अनुभव आहे. भांडूपच्या सह्याद्री विद्यामंदिर येथे ते क्रीडाशिक्षक म्हणून नोकरी करत असून श्री. सह्याद्री संघ या खो-खो संघाचे ते संस्थापक प्रशिक्षक आहेत. २०१८ साली भारतीय खो-खो संघाच्या इंग्लंड दौर्‍यात त्यांनी सामनाधिकारी म्हणून काम पाहिले होते.

गंधाली पालांडे या सध्या महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या सह-सचिव आहेत. तसेच नवी मुंबईतील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंची भरणा असलेल्या रा.फ. नाईक विद्यालय आणि ग्रिफीन जिमखाना यांच्या खो-खो संघाच्या त्या व्यवस्थापिका आहेत.